बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना कृषी विभागाने जोरदार झटका दिला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अप्रमाणित मिश्रखताचा पुरवठा केल्याबद्दल सहकारमंत्र्यांच्या कंपनीवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना कृषी विभागाने जोरदार झटका दिला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अप्रमाणित मिश्रखताचा पुरवठा केल्याबद्दल सहकारमंत्र्यांच्या कंपनीवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमंगलवर कडक कारवाई करायची की नाही, याबाबत गेल्या तीन महिन्यांपासून कृषी खात्यात काथ्याकूट चालू होता. कृषी आयुक्त सुहास दिवसे व औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली. 

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर फौजदारी कारवाईचा निर्णय घेतला गेला. मराठवाड्यात विकले जाणारे १८:१८:१०, २०:२०:० व १०:२०:२० ग्रेडचे मिश्रखत कृषी खात्याच्या रडारवर होते. या प्रकरणानंतर लाखो रुपयांचे खत जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कंपनी कोणाच्याही मालकीची असली, तरी शेतकऱ्यांची फसवणूक हेतूतः होत असल्यास कायद्यातील तरतुदीनुसार कामकाज करा, अशा सूचना गुणनियंत्रण निरीक्षकांना देण्यात आल्या. त्यामुळे गुन्हा दाखल करावा लागला, अशी माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime on Lokmangal company in bogus fertilizer case