सावकारीविरुद्ध सासवडला गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नुकतेच सावकारीविरुद्ध तक्रारी देण्यासाठी आवाहन केले होते. येथे बेकायदा सावकारीचे अनेक प्रकार आहेत. मात्र, पिळवणूक होणारे लोक आतापर्यंत दहशतीने गप्प बसत होते. आम्ही बेकायदा सावकारी विरुद्ध सुरू केलेल्या विशेष अभियानात ही पाळेमुळे खोदायची आहेत. त्याला लोकांनी साथ द्यावी.
- क्रांतीकुमार पाटील, पोलिस निरीक्षक, सासवड 

सासवड - येथील सासवड शहरातील एका बेकायदा सावकाराने गराडे (ता. पुरंदर) गावातील एकास सावकारीने पैसे देऊन ते सारे व्याजाने वसूल केले, तरी सुरक्षेपोटी घेतलेले कोरे चेक वापरून त्याला नोटीस पाठविली. त्याशिवाय त्याची दुचाकी व सोन्याच्या तीन अंगठ्या दमदाटी करून बळजबरीने नेल्या. त्यामुळे या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा अलीकडील काळातला तिसरा गुन्हा आहे. 

याबाबत संशयित आरोपी नंदकुमार गेनबा जगताप (रा. सासवड, ता पुरंदर) या बेकायदा सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्याला अद्यापी अटक झाली नसून, पोलिस त्याच्या शोधात आहेत. फिर्यादी संतोष बुवासाहेब तरडे (वय ३९, रा. गराडे, ता. पुरंदर) हे असून, काल रात्री उशिरा सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली. 

तरडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नंदकुमार जगताप यांनी सावकारी कर्जाने ६ लाख रुपये १० टक्के व्याज दराने सन २०१६ मध्ये दिले होते. हे सावकारी कर्ज देऊन फिर्यादी तरडेकडून ९ लाख २४ हजार ८५० रुपये जगताप याने परतफेडीत घेतले. तरीही पुन्हा ३ लाख रुपये भांडवलापोटी घेतले व आपला व्यवहार संपला आहे, असे जगताप याने सांगितले होते.

मात्र, फिर्यादी तरडे हे आता आरोपी जगतापला आगावू रक्कम देत नाही, म्हणून सुरक्षिततेपोटी फिर्यादीकडून घेतलेले २ कोरे चेक वापरले. त्या चेकवर रक्कमचे आकडे टाकून ते चेक भरले व ते न वटल्याने त्याबाबत आरोपीने फिर्यादीला नोटीस पाठवली. शिवाय, आरोपी जगतापने फिर्यादी तरडे याच्याकडून काही देणे नसतानाही.. दुचाकी व सोन्याच्या तीन अंगठ्या दमदाटी करून बळजबरीने नेल्या.

Web Title: crime on money lender