'काहींवर हातोडा' तर 'काहींच्या डोक्यावर हात'; अतिक्रमण कारवाईत पालिकेची दुटप्पी भूमिका

नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या नांदेड,किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये आज पुन्हा पालिकेच्या अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या ताफ्याने धडक दिली.
Crime on Encroachment
Crime on EncroachmentSakal
Summary

नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या नांदेड,किरकटवाडी, खडकवासला या गावांमध्ये आज पुन्हा पालिकेच्या अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या ताफ्याने धडक दिली.

किरकटवाडी - नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या नांदेड, (Nanded) किरकटवाडी, (Kirkitwadi) खडकवासला (Khadkwasla) या गावांमध्ये (Village) आज पुन्हा पालिकेच्या (Municipal) अतिक्रमणांवर (Encroachment) कारवाई (Crime) करणाऱ्या ताफ्याने धडक दिली. पालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून संयुक्तपणे सुरू असलेल्या सदर कारवाईत 'काहींना' जाणीवपूर्वक अभय देण्यात आल्याचे दिसल्याने या कारवाई विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिकांचा संताप पाहून अगोदर पोलीस व नंतर पालिका प्रशासनाने कारवाई न करता खडकवासला गावातून काढता पाय घेतला.

1 एप्रिल रोजी पालिका प्रशासनाने सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती. आज दि 4 एप्रिल रोजी नांदेड सिटी गेट समोरुन पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. व अतिक्रमण कारवाईसाठी आलेला पालिकेच्या वाहनांचा भला मोठा ताफा खडकवासल्यापर्यंत येऊन पोहोचला. खडकवासला येथील नागरिकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता व मोजणी न करता मनमानी पद्धतीने प्रशासन कारवाई करत असल्याने अधिकाऱ्यांसमोर तीव्र संताप व्यक्त केला. तसेच काहींच्या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याबाबतही नागरीकांनी अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई अर्धवट सोडत काढता पाय घेतला.

आमची हद्द नाही, आम्ही चाललो

पालिकेच्या कारवाईदरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पुणे शहर पोलीसांचा मोठा फौजफाटा सोबत होता. नांदेड फाट्याच्या पुढे ग्रामीण पोलीसांची हद्द असल्याचे काही नागरिकांनी आलेल्या पोलीसांना सांगितल्यानंतर पोलीस अधिकारी संभ्रमात पडले. नागरिक संतापले आहेत, वादावादी झाली तर काय करायचे? हा भाग आमच्या हद्दीत नाही, आम्ही चाललो असे पालिकेच्या अधिकाऱ्यांना म्हणत पोलीस अधिकाऱ्यांनी लगेच काढता पाय घेतला. त्यापाठोपाठ पालिका अधिकाऱ्यांच्या गाड्याही निघून गेल्या.

'जाणीवपूर्वक काही धनदांडग्यांची व लोकप्रतीनिधींची अतिक्रमणे तसेच ठेवून गोरगरिबांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी अगोदर मोजणी करुन हद्द निश्चित करावी व मगच कारवाई करावी. तसेच कारवाई सर्वांवर व्हावी अन्यथा अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तर देऊ."

- कुणाल सरवदे, आरपीय, खडकवासला मतदारसंघ युवक आघाडी अध्यक्ष.

"नागरिक- व्यावसायिकांना अगोदर पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. अडचणीत असलेल्या व्यावसायिकांचे कारवाईत मोठे नुकसान होत आहे. कोणत्याही सुविधा न देता या नव्याने समाविष्ट गावांमधील अतिक्रमणांवर कारवाईबाबत एवढी तत्परता प्रशासन कशासाठी दाखवत आहे?"

- विजय मते, मनसे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष.

"कारवाईतून कोणालाही सूट मिळणार नाही. आजची कारवाई स्थगित करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी मोठी कारवाई करण्याचे आमचे नियोजन आहे. व्यावसायिकांच्या मालाचे किंवा वस्तूंचे नुकसान होणार नाही यासाठी त्यांना अगोदर पूर्वकल्पना देण्यात येणार आहे. वरिष्ठांकडून जसे आदेश येत आहेत त्याप्रमाणे आमची कारवाई सुरू आहे."

- निशिकांत छापेकर, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, पुणे मनपा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com