पुणे : आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई सुरू; तरीही अनेक भागांत फ्लेक्स जागेवरच

पुणे शहर स्वच्छ, सुंदर असावे यासाठी एकीकडे स्वच्छता मोहित हाती घेतली जाते तर दुसरीकडे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावून शहर विद्रूप केले जात आहे.
Crime on Flex
Crime on FlexSakal
Summary

पुणे शहर स्वच्छ, सुंदर असावे यासाठी एकीकडे स्वच्छता मोहित हाती घेतली जाते तर दुसरीकडे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावून शहर विद्रूप केले जात आहे.

पुणे - चौकात, रस्त्यांवर फ्लेक्सबाजी (Flex) करून चमकोगिरी करणाऱ्या तथाकथित समाजसेवक व पुढाऱ्यांना क्षेत्रीय कार्यालयांकडून अभय मिळत असल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन कारवाई (Crime) का होत नाही? असा जाब विचारला. त्यानंतर शहरातील कारवाईला सुरवात झाली आहे. तरीही अजून अनेक भागांत फ्लेक्सवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

पुणे शहर स्वच्छ, सुंदर असावे यासाठी एकीकडे स्वच्छता मोहित हाती घेतली जाते तर दुसरीकडे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावून शहर विद्रूप केले जात आहे. शहराच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राजकीय पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शहर घाण करायला हातभार लावला जात आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत तीन हजार ९३७ अनधिकृत फ्लेक्स आढळून आले. असे असताना महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याचे समोर आले.

फ्लेक्सबाजी करताना १० बाय १० पासून ते ३० बाय ४० पर्यंत असे मोठे फ्लेक्स लावले जात आहेत. जेवढा मोठा फ्लेक्स तेवढा वजनदार माणूस असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न या समाजसेवक, पुढारी व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो. नागरिकांनी तक्रार केली तर त्याची दखल घेतली जात नसल्याने या चमकोगिरीला प्रोत्साहनच मिळत आहे.

‘एकही फ्लेक्स शिल्लक ठेवू नका’

`सकाळ’ने फ्लेक्सबाजीकडे लक्ष वेधले, त्यानंतर प्रशासन काही प्रमाणात हलले असले तरी शहरातील प्रमुख रस्ते सोडता बहुतांश भागात फ्लेक्स कायम आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन कारवाई का होत नाही, काय अडचण आहे, असा जाब विचारला. त्या वेळी कारवाईसाठी मनुष्यबळ अपुरे असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचवेळी आयुक्तांनी मग तुम्ही ते उपलब्ध करून त्वरित कारवाई सुरू करा, एकही फ्लेक्स शिल्लक ठेवू नका व परत लागणार नाहीत याकडे लक्ष द्या, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे दुपारनंतर शहराच्या विविध भागांत कारवाईला प्रारंभ झाला.

अजूनही या भागांत आहेत फ्लेक्स...

मुंढव्यातील केशवनगर झेड कॉर्नर, शिवाजी चौक, बधे वस्ती, महात्मा फुले चौक, मुंढवा गावठाण, फातिमानगर चौक, पिसोळी, महंमदवाडी, सय्यदनगर हांडेवाडी, खराडी, विश्रांतवाडी, धानोरी, मार्केट यार्ड, महर्षीनगर, संदेश नगर, पंचमी चौक, बालेवाडी-बाणेर मुख्य रस्ता, सदानंद चौक, गणराज चौक, बाणेर फाटा, साई चौक, मिटकॉन चौक, जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन रस्ता) रस्ता, दीप बंगला चौक, वेताळबाबा चौक, कुसाळकर चौक, शिवाजीनगर गावठाणातील अंतर्गत भागासह टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, दांडेकर पूल, गिरिजा हॉटेल परिसरातही फ्लेक्स आहेत. हडपसर, मांजरी, बिबवेवाडी, अण्णा भाऊ साठे पुतळा, महेश सोसायटी चौक, अप्पर शेवटचा थांबा, आंबेगाव बुद्रुक, दत्तनगर, शनिनगर, जांभूळवाडी, कोळेवाडी, हनुमाननगर.

पोलिस करणार सहकार्य

मोठ्या प्रमाणात बेकायदा फ्लेक्‍स, बॅनरबाजीद्वारे राजकीय पक्षांसह स्वयंभू कार्यकर्त्यांकडून शहराचे विद्रूपीकरण सुरू आहे. त्यावर महापालिकेकडून कारवाई सुरु आहे, त्यांना आवश्यकता भासल्यास पोलिसांकडून सहकार्य केले जाईल, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले. शहरात सध्या राजकीय व्यक्ती, त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे, वाढदिवसांसह विविध प्रकारचे फ्लेक्‍स, बॅनर लावले जात आहेत. ‘सकाळ’ने या बेकायदा फ्लेक्‍स, बॅनरबाजीबाबतचे वृत्त प्रसिद्ध करीत हा प्रकार चव्हाट्यावर आणला होता. बेकायदा फ्लेक्‍सबाबत नागरिकांनीही तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली होती. दरम्यान, असे असूनही फुकटची फ्लेक्‍सबाजी करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने अद्यापही ठोस कारवाई केलेली नाही. यापूर्वी मंगळवार पेठेत भर चौकात होर्डिंग कोसळल्यामुळे काही नागरीकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या बेकायदा फ्लेक्‍स, बॅनरबाजीबाबत पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, ‘‘महापालिकेचे होर्डिंगबाबत धोरण ठरलेले आहे. त्यातून महापालिकेला महसूल मिळतो. त्यामुळे बेकायदा होर्डिंग, फ्लेक्‍स व बॅनरवर पालिकेकडून कारवाई केली जाते. त्यांना ही कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत लागल्यास जरूर करू. स्थानिक पोलिसांमार्फत क्षेत्रीय कार्यालयांना सहकार्य केले जाईल.’’

फ्लेक्स काढले, पण सांगाडे ठेवले

फ्लेक्सवर कारवाई करताना फ्लेक्ससह सांगाडेही काढले जात असल्याचा दावा प्रशासन करत आहे. पण अनेक ठिकाणी केवळ फ्लेक्स काढले जात आहेत. त्यामुळे सांगाडे तेथेच असल्याने फ्लेक्स लावण्यासाठी आयती सुविधा प्रशासन उपलब्ध करून देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com