Crime News : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या बालिकेचा खून, जोडप्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime police Khadki girl murder case exposed love relationship couple arrested

Crime News : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या बालिकेचा खून, जोडप्याला अटक

पुणे : खडकी येथील दोन वर्षांच्या बालिकेच्या खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यामुळे या जोडप्याने मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे.

संतोष देवमन जामनिक (वय २५) आणि एक महिला (वय २६, दोघे रा. पिंपळे गुरव, मूळ रा. खिरपुरी, ता. बाळापूर, जि. अकोला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खडकी येथील सीएफडी मैदानावर २ मार्च रोजी एका बालिकेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेने तीन स्वतंत्र पथके तयार करून समांतर तपास सुरू केला. युनिट चारच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. या फुटेजमध्ये एक जोडपे मुलीला कडेवर घेऊन खडकी बाजाराच्या दिशेने जाताना दिसले. या जोडप्याने त्या मुलीला घटनास्थळी टाकून पोबारा केला होता.

तपासादरम्यान, या जोडप्यातील एकजण अकोला येथील असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेने अकोला पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी या जोडप्यामध्ये प्रेमसंबंध असून, ते दोन वर्षांच्या मुलीला घेऊन पळून गेल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी पिंपळे गुरव परिसरात या जोडप्याचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी दापोडी येथील एका बांधकाम साइटवर मजुरीचे काम करीत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे युनिट चारच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव आणि उपनिरीक्षक जयदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पहिल्या पतीपासून तीन मुले

आरोपी महिलेचे यापूर्वी एका व्यक्तीसोबत लग्न झाले आहे. पहिल्या पतीपासून तिला तीन मुले असून, ती वेगळी राहत होती. त्यानंतर या महिलेचे आरोपी संतोष याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु प्रेमसंबंधात ही मुलगी अडसर ठरत असल्यामुळे तिचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींना खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Pune Newscrime