esakal | 'केअर टेकर' बनून दरोडा टाकणाऱ्या टोळीविरुद्ध पुण्यासह राज्यात गुन्हे दाखल

बोलून बातमी शोधा

Crime

'केअर टेकर' बनून दरोडा टाकणाऱ्या टोळीविरुद्ध पुण्यासह राज्यात गुन्हे दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - औंध येथील वृद्ध दाम्पत्याच्या बंगल्यामध्ये घुसून दाम्पत्यास मारहाण करीत बाथरुममध्ये कोंडून ठेवल्यानंतर 18 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या टोळीला चतुःशृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. केअर टेकर म्हणून वृद्ध नागरीकांच्या घरांमध्ये प्रवेश घेऊन आरोपी घरांमध्ये दरोडा टाकत होते. चतुःशृंगी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून राज्याच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या.

संदीप भगवान हांडे (वय 25, रा. पिंपळखेडा, औंरगाबाद), मंगेश बंडू गुंडे (वय 20, रा.वडीकाळ्या, जालना), राहूल कैलास बावणे (वय 22, रा.पीर कल्याण, जालना), विक्रम दिपक थापा उर्फ बिके (वय 19, रा. विनयनगर, नाशिक), किशोर कल्याण चनघटे (वय 21, रा. औरंगाबाद), भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय 25, रा. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन दुचाकी, सोने व हिऱ्याचे दागिने, कॅमेरा असा साडेसतरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंधमधील सिंध सोसायटीमधील एका बंगल्यात 25 मार्चला रात्री रात्री साडेआठ वाजता तिघांनी घरात घुसून त्यांच्याकडील आचाऱ्याला, वृद्ध दाम्पत्यास मारहाण केली. त्यानंतर तिघांनाही चाकूचा धाक दाखवून बाथरुमध्ये कोंडले. त्यानंतर घरातील रोकड, सोने-हिऱ्याचे दागिने असा 15 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरी केली होती. तिघांनी बाथरुमचा दरवाजा तोडला, त्यानंतर दाम्पत्याने त्यांच्या मुलाला घडलेली घटना सांगितले. त्यानंतर याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा: पुण्यातील कलाकारांकडून पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्याचा उपक्रम

या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा दरोडा संदीप हांडे व त्याच्या साथीदारांनी केल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चार दिवसांपासून पुणे, औरंगाबद, जालना या शहरामध्ये जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच या पद्धतीने आणखी पाच ते सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. संदीप, मंगेश व राहूल या तिघांनी मिळून सिंध सोसाटीत दाम्पत्याला लुटले होते. तर सहा जणांनी तीन मार्च रोजी वृंदावन सोसाटीतील वृद्ध दाम्पत्यास लुटले होते. पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलिस आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दादा गायकावाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, महेश भोसले, पोलिस कर्मचारी दिनेश गंडाकुश, मुकुंद तारु, प्रकाश आव्हाड, श्रीकांत वाघवले, प्रमोद शिंदे, संतोष जाधव यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

तीन महिने सेवा शुश्रृषेनंतर घातला दरोडा

आरोपी हांडे याने शहरातील 16 ते 17 नर्सिंग ब्युरोमध्ये केअर टेकर पदासाठी नावनोंदणी केली आहे. वृद्ध नागरीकांच्या गरजेनुसार संबंधीत संस्थेमार्फत तो जात असे. त्याच पद्धतीने त्याने सिंध सोसायटीतील दाम्पत्याकडेही तीन महिने केअर टेकर म्हणून काम केले. त्यानंतर घरातील सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर त्याने मंगेश, राहूलसमवेद दाम्पत्याच्या घरी दरोडा टाकला. हांडेने यापुर्वी मिथून जगताप याच्या मदतीने 2019 मध्येसही सिंध सोसायटीतीलच एका वृद्ध दाम्पत्याच्या डेबीट व क्रेडीट कार्डचा क्रमांक मिळवून त्यांचे पावणे दोन लाख रुपये काढून घेतले होते. यापुर्वी देखील त्याने पिंपरी-चिंचवड परिसरातली एका वृद्ध महिलेस चाकूचा धाक दाखवून, बाथरुममध्ये कोंडून महिलेच्या घरातील सव्वा चार लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. हांडे हा सराईत गुन्हेगार असून तोच या टोळीचा प्रमुख आहे.

"शहरात वृद्ध नागरीकांची संख्या मोठी आहे. विशेषतः लॉकडाऊनमुळे मुले व इतर नातेवाईक दुसऱ्या शहरात असल्याने वृद्धांना घरात काळजी घेण्यासाठी केअर टेकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्याचाच आरोपींनी गैरफायदा घेत हा गुन्हा केला. नागरीकांनी केअर टेकर ठेवताना विशेष काळजी घ्यावी, नोंदणीकृत संस्थेकडूनच केअर टेकर व्यक्ती घ्यावी.''

- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त. परिमंडळ चार.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा