गुन्ह्यांच्या शतकाजवळ आरोपीची भरली शंभरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पुणे - घरफोडीसह विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या ‘सेंच्युरी’जवळ पोचलेल्या एका सराईत गुन्हेगारास चतुःशृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चाळीस तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा १३ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला.

जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३२, रा. कातवी, ता. मावळ, मूळ रा. औंध) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून, त्यास घरफोडीच्या गुन्ह्यातच २०१३ ला एक वर्ष व तीन महिन्यांची शिक्षा झाली होती. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी त्यास तडीपार केले होते. सहायक पोलिस निरीक्षक संदेश केंजले, पोलिस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे यांना गायकवाड हा पाषाण येथील निम्हण मळ्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस कर्मचारी बबन गुंड, महेश बामगुडे, मारुती पारथे यांच्यासमवेत सापळा रचून ताब्यात घेतले, अशी माहिती उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी व पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिली.

मौजमजेसाठी घरफोडी 
बंद घरांची पाहणी करून गायकवाड हा एकटाच घरफोडी करत असे. सोने गहाण ठेवून, त्यातून आलेले पैसे तो मौजमजेसाठी वापरत होता. तसेच सतत राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. गायकवाड याच्या नावावर आतापर्यंन ८७ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये घरफोडीसह एटीएम मशिन फोडल्याच्या ११ गुन्ह्यांचा समावेश आहे.

Web Title: criminal arrested in pune