‘वराहपालकांवर गुन्हे दाखल करा’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पिंपरी - शहरातील डुकरांच्या त्रासाबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केली. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वराहपालन करणाऱ्या तीन व्यवसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला.

स्थायी समिती सभेत सदस्य विकास डोळस आणि सागर अंघोळकर यांनी डुकरांच्या त्रासाचा विषय उपस्थित केला होता. दरम्यान, महापालिकेकडून डुकरांचा बंदोबस्त होत नसल्याचा आरोप करून आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात डुक्कर सोडून शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी गेल्या आठवड्यात निषेध केला होता. त्यानंतर महापालिकेने वराहपालन करणाऱ्या मालकांना नोटीस बजावली होती.

‘वराह पालकांनी त्यांच्याकडील डुकरे सात दिवसांच्या आत महापालिकेच्या हद्दीबाहेर हलवावीत; अन्यथा कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील,’ असे नोटीसमध्ये म्हटले होते. तरीही डुकरांचा त्रास होत असल्याने त्यांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी सभेत केली. त्यामुळे वराहपालकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश आयुक्त हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिला.

Web Title: criminal cases to boar parents in pcmc