मैत्रिणीवर 'इम्प्रेशन' पाडण्यासाठी त्यानं मित्रालाच फसवलं; ५ लाखाचा मुद्देमाल घेऊन ठोकली धूम!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 December 2020

मित्र अडचणीत असल्याचे पाहून अक्षयने ऋषिकेशला त्याच्या मित्राची रुम राहण्यास दिली. तसेच त्याचा स्मार्ट फोन आणि दुचाकी वापरण्यास दिली.​

पुणे : क्रिकेट खेळताना ओळख झालेल्या तरुणाने ओळख वाढविल्यानंतर मैत्रिणीवर 'इम्प्रेशन' मारण्याचा बहाणा करुन मित्राची लाखो रूपयांची सोनसाखळी, दुचाकी अन स्मार्टफोन पळवून नेली. सिंहगड पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास बेड्या ठोकल्या. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ऋषिकेश मोहन बोंबले (वय २८, रा. खेड, मंचर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय काळूराम धावडे यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय धावडे याची  ऋषिकेशसमवेत क्रिकेट खेळताना ओळख झाली होती. त्यानंतर त्याने हळुहळु ओळख वाढवुन अक्षयशी मैत्री केली. जवळची मैत्री झाल्याने ऋषिकेशने त्यास नोकरी आणि राहण्याची समस्या असल्याचे सांगितले. मित्र अडचणीत असल्याचे पाहून अक्षयने ऋषिकेशला त्याच्या मित्राची रुम राहण्यास दिली. तसेच त्याचा स्मार्ट फोन आणि दुचाकी वापरण्यास दिली. 

अखेर २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश; राज्य सरकारने काढला आदेश!​

दरम्यान, अक्षय आणि ऋषिकेश असे दोघेही 16 डिसेंबरला नाष्टा करत असताना ऋषिकेशने त्याच्या मैत्रिणीवर 'इम्प्रेशन' मारण्यासाठी अक्षयची १५ तोळ्याची सोन्याची चैन मागत गळ्यात घातली. नाष्टा झाल्यानंतर ऋषिकेशने माझा मित्र येणार आहे, जरा तिकडे बघ असे सांगत अक्षयचे लक्ष विचलीत करुन अक्षयचा मोबाईल फोन, दुचाकी आणि १५ तोळ्याची सोन्याची चैन असा पाच लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला.

या गुन्ह्याचा सिंहगड पोलिस तपास करीत असताना ऋषिकेश त्याची राहण्याची ठिकाणे सारखे बदलत होता. त्याचा शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या मदतीने मिळालेल्या माहितीवरुन आरोपी ऋषिकेश बोंबले यास अटक केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चंदननगर पोलीस स्टेशन आणि चिखली पोलीस स्टेशन येथे याच स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. 

खलिस्थान समर्थकास NIAनं केली अटक; पुण्यातील एका प्रकरणी आढळला दोषी

15 तोळ्याची सोनसाखळी गहाण ठेवत काढले साडेचार लाख रूपयांचे कर्ज

पोलिसांनी आरोपी ऋषिकेशकडून दुचाकी आणि स्मार्ट फोन जप्त केला. आरोपीने १५ तोळ्याची सोनसाखळी ही एका नामांकित फायनान्स कंपनीत गहाण ठेवली. त्यापोटी चार लाख 60 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधीत फायनान्स कंपनीकडून सोनसाखळी हस्तगत करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.

"नागरिकांनी अनोळखी नागरिकांशी मैत्री करताना व मदत करताना योग्य ती खबरदारी घ्यावी आणि फायनान्स कंपनीनेही ग्राहकांना कर्ज देताना योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी करावी."

- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड पोलिस ठाणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal cheated his friend of five lakh rupees to impress his girlfriend