भुरट्या गुन्हेगारांचा उदो उदो

भुरट्या गुन्हेगारांचा उदो उदो

पुणे - शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीतील छोट्याशा खोलीत राहणारा एक तरुण. एका गुन्ह्यातील शिक्षा संपवून कारागृहाबाहेर पडला. त्यानंतर या उदयोन्मुख ‘भाई’च्या स्वागतासाठी टोळकीच्या टोळकी आली. शंभर दीडशे तरुण आणि त्यांच्या पाच-पन्नास दुचाकींच्या गर्दीत, बुलेटच्या सायलेंसरमधून फटाक्‍यांचे आवाज काढत भाईने आपल्या वस्तीत ‘एन्ट्री’ मारली. त्या वेळी त्याच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत वस्तीत आपलीच दहशत कशी आहे, हे दाखवून दिले! 

अशा प्रकारे सध्या शहरातील कोणत्याही वस्तीमध्ये गुंडप्रवृत्तीचे तरुण रात्री-अपरात्री वाढदिवस, सण, जयंती किंवा कुठल्या तरी उत्सवाचे निमित्त साधून तरुणांच्या, गाड्यांच्या गर्दीत ‘एन्ट्री’ मारत स्वतःची भाईगिरी दाखवीत असल्याचे चित्र आहे.

शहरामध्ये काही महिन्यांपासून ‘स्ट्रीट क्राइम’ नावाचा प्रकार वाढला आहे. या प्रकाराला किरकोळ, सराईत गुन्हेगारांचे वाढदिवस, त्यांच्याकडून साजरे होणारे सण, उत्सव व जयंत्या कारणीभूत ठरत आहेत. विशेषतः वेगवेगळ्या नावांखाली संघटना निर्माण करून आपल्याभोवती तरुण व मुलांची गर्दी जमविण्यास गुन्हेगारांकडून प्राधान्य दिले जाते. त्यानंतर एखाद्या तरुणाच्या वाढदिवसाला वस्तीमध्ये दुचाकींवरून फेरी (एन्ट्री मारणे) मारतात. तलवारीने केक कापणे, भरपूर मद्यपान, धूम्रपान करून रात्री-अपरात्री वस्तीमध्ये जोरदार घोषणाबाजी करून दहशत निर्माण केली जाते.

उदयोन्मुख भाईच्या ‘एन्ट्री’ मारण्याच्या प्रकारातील गर्दीची वस्तीमधील नागरिकांमध्ये मोठी चर्चा होते. ती स्थानिक राजकीय व्यक्तीच्या कानावर जाते. त्यानंतर ती व्यक्ती उदयोन्मुख ‘भाई’ला 

स्वतःसाठी काम करण्यास सांगते. त्यासाठी खास भोजनाचे निमंत्रण दिले जाते. त्यानंतर पैशांपासून ते गुन्हे केल्यानंतर तत्काळ पोलिसांकडून बाहेर काढण्यासारखी मदत करण्याचीही तयारी दर्शविली जाते. दरम्यान, याच ‘एन्ट्री’द्वारे गुन्हेगारी टोळ्या एकमेकांना खुन्नस देण्याचाही प्रयत्न करतात. त्यातूनच पुढे स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नातून तलवारी, कोयते, पिस्तूल यांसारख्या शस्त्रांचा वापर करून  झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रकार घडत आहेत.

त्यांचे ब्रॅंडेड राहणीमान!
कारागृहामधून सुटलेल्या गुन्हेगाराच्या राहणीमानापासून ते वागण्या-बोलण्यापर्यंत अनेक बदल झालेला असतो. कारागृहामध्ये काही सराईत गुन्हेगारांशी ओळख होते. तेथून बाहेर पडल्यानंतर सराईत गुन्हेगार, राजकीय व्यक्‍ती किरकोळ गुन्हेगारांना भरपूर पैसा पुरवितात. त्यामुळे बूट, शर्ट, जीन्स, घड्याळापासून गॉगलपर्यंत सगळ्याच गोष्टी ब्रॅंडेड होतात. त्यामुळे त्याचे वजन वाढण्यास सुरवात होते. त्यातूनच वस्तीतील मुले त्यांच्याकडे आकर्षित होतात.

‘एन्ट्री’वर कारवाई नाही
झोपडपट्ट्यांमध्ये किरकोळ व सराईत गुन्हेगार, त्यांच्या साथीदारांकडून सर्रासपणे रात्री-अपरात्री ‘एन्ट्री’ मारण्याचा प्रकार सुरू आहे. स्थानिक पोलिसांना ही माहिती असते. मात्र, त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही. 

संघटना तयार करून तरुण, अल्पवयीन मुले आपल्याभोवती गुन्हेगार जमवितात. त्यानंतर कोणाच्याही वाढदिवसाला शंभर-दीडशे जण गाड्यांवरून येऊन गोंधळ घालून अप्रत्यक्षरीत्या दहशत पसरवितात. त्यांच्याविरुद्ध आवाज उठविल्यास स्वतःला व कुटुंबाला धोका निर्माण होईल, या भीतीपोटी कोणीही पुढे येत नाही. मात्र, हा प्रकार सातत्याने वाढत आहे. त्याचा फटका थेट गोरगरिबांना बसतो.
- शिरीष सरदेशपांडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com