पिंपरीत गुन्हेगारांना पायघड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पिंपरी- गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींना बहुतांश प्रमुख पक्षांनी शहरात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. १७ उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे असल्याचे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.

पिंपरी- गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींना बहुतांश प्रमुख पक्षांनी शहरात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. १७ उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे असल्याचे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.

‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवून घेणाऱ्या भाजपने ‘वाकड’मधील एका टोळीतील गुन्हेगाराला उमेदवारी दिली आहे. विविध गंभीर गुन्ह्यांमुळे ‘मोका’अंतर्गत पाच वर्षे तो कारागृहात होता. निगडी, हिंजवडी, भोसरी, कोथरूड, चतुःशृंगी पोलिस ठाण्यात त्याच्या नावे खून, खंडणी, दहशत, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ही उमेदवारी वादाचा विषय झाली आहे. भाजपच्या आणखी एका महिला उमेदवाराच्या पतीवरही तडीपारीची कारवाई होणार होती; मात्र एका बड्या नेत्याच्या मध्यस्थीमुळे ती लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजले. दोन वर्षांपूर्वी ‘सांगवी’मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील एका आरोपीसह मारहाणीच्या अनेक गुन्ह्याची नोंद असलेल्या एका ‘इस्टेट एजंट’लाही या पक्षानेच उमेदवारी दिली आहे. त्यांच्याच भोसरीतील  उमेदवारावर खुनाचा गुन्हा दाखल होता. त्यातून तो सुटला असला, तरी परिसरात अद्यापही त्यांची दहशत असल्याचे दिसून येते.

बनावट दारू विक्रेताही ‘पुढारी’
बनावट दारू विक्रीमध्ये पुणे परिसरात ‘किंग’ समजल्या जाणाऱ्या शहरातील एका विक्रेत्याने त्याच्या पत्नीला चक्क भाजपची उमेदवारी मिळवून दिली आहे. शहरातील काही मान्यवरांनी त्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे पोलिसांनाही हे ऐकून धक्का बसला. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते या विषयावर चकार शब्द बोलत नाहीत हेसुद्धा आणखी दुसरे आश्‍चर्य.

Web Title: criminals candidate in pcmc