‘स्पॉटर किट’मुळे गुन्हेगार जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

गुन्हेगारांसह संशयितांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे ‘स्पॉटर किट’ शहर पोलिसांनी विकसित केले असून, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते बुधवारी त्याचे उद्‌घाटन झाले. गस्तीवरील पोलिसही या किटचा वापर करून गुन्हेगारांना पकडू शकतात.

पुणे - गुन्हेगारांसह संशयितांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे ‘स्पॉटर किट’ शहर पोलिसांनी विकसित केले असून, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या हस्ते बुधवारी त्याचे उद्‌घाटन झाले. गस्तीवरील पोलिसही या किटचा वापर करून गुन्हेगारांना पकडू शकतात.  

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व मोबाईलमधून मिळणाऱ्या सूचनांनुसार ३६० अंशांत छायाचित्रे घेणारे कॅमेरे या किटमध्ये आहेत. तसेच महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसह नागरिकांची सुरक्षाही करता येईल. आयुक्तांसह उपायुक्त बच्चन सिंह, उपायुक्त मितेश घट्टे यांच्या उपस्थितीत किटचे उद्‌घाटन झाले.

स्पॉटर किटमध्ये हार्डवेअर आणि आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. इंटिग्रेटेड कॅमेरे, हॉर्डवेअर, सॉफ्टवेअरमुळे संशयितांची ओळख पटविण्यास मदत होईल. तसेच डोअर फ्रेम मेटल डिटेक्‍टर्स, सर्व्हेलन्स व्हेइकल्स बेस्ट कमांड सेंटर्स, मोबाईल क्‍लाउड टेक्‍नॉलॉजीमुळे तपास पथकाला मदत होणार आहे. शहराची दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, लष्कराचे सर्दन कमांड, साउथ वेस्टर्न एअर फोर्स कमांडच्या मुख्य कार्यालयासह संवदेनशील परिसरातील सुरक्षितता वाढण्यास या कीटमुळे मदत होणार आहे. पोलिसांनी मणिपाल ग्रुप एंटिटीज आणि विद्या लॅब्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पॉटर किट’ विकसित केले आहे.

...असे चालणार स्पॉटर किट
स्पॉटर किटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामध्ये ३६० अंशांत छायाचित्रे घेणाऱ्या कॅमेऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे गुन्हेगार आणि संशयितांना प्रत्यक्ष घटनास्थळावर हेरण्यासाठी किटला मोबाईलद्वारे सूचना देण्यात येणार आहे. त्यानुसार पोलिस अधिकारी आणि बीट मार्शल्सना गुन्हेगारांची माहिती घटनास्थळावरील छायाचित्रांशी पडताळून पाहण्यास मदत होणार आहे. तसेच संशियतांना ताब्यात घेण्याचा मार्ग सोपा होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminals in Trap by Spotter Kit