esakal | दक्षिण पुण्यात ऐन पावसाळ्यात नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण पुण्यात ऐन पावसाळ्यात नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट

दक्षिण पुण्यात ऐन पावसाळ्यात नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट

sakal_logo
By
अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : दक्षिण पुण्यातील नागरिकांसमोर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभा राहिले आहे. यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी आहे. कात्रज-आंबेगाव-कोंढवा रस्ता परिसरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. तरी प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यांविषयी काळजी घेऊन पाणी संकट दूर करण्याची मागणी होत आहे.

वडगाव पंपिग स्टेशन येथून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील केदारेश्वर टाकी आणि महादेवनगर टाकी पूर्ण क्षमतेने भरली जात नाही. परिसरात रात्री अपरात्री पाणी येते. दक्षिण पुण्यातील नागरी वस्ती आणि आजूबाजूला नवीन इमारती पाहता टाकीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागत नव्हते. मात्र, आता केवळ पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर, ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा त्रास झाला नाही. मात्र, आता पाणीटंचाईच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक चिंतेत आहेत.

यासंबंधी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि स्वारगेट पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. त्याचबरोबर, प्रशासनाने पुन्हा सोमवारपासून पाणीपुरवठ्यात बदल केला आहे. या भागातील पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस बंद राहणार आहे. राजीव गांधी पंपीग स्टेशन येथून केदारेश्वर आणि महादेवनगर या टाक्यांना पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही टाक्यांतून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या परिसराचे प्रशासनांकडून सात उपविभाग करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे एका उपविभागाचा आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा: पुण्यातील IISERच्या लॅबमध्ये लागली आग; जीवितहानी नाही

हेही वाचा: पूजा चव्हाणचे आई-वडिल म्हणतात, ''आत्महत्येनंतर झालं ते केवळ राजकीय नाट्य''

''पूर्वी पाणीपुरवठा व्यवस्थित होत होता. परंतु, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदलानंतर हा त्रास सुरु झाला आहे. पाणीटंचाईसाठी पूर्णपणे प्रशासनाचा ढिसाळपणा कारणीभूत आहे. खडकवासला धरणांतून पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा सुरु असल्याचे सांगण्यात येते. मग मध्येच पाण्याची चोरी होते का? असा प्रश्न उपस्थित होतो. तसे असेल तर प्रशासनाने कारवाई करावी. अन्यथा आम्ही अंदोलनाचा मार्ग अवलंबू.''

- युवराज बेलदरे, स्थानिक नगरसेवक

''पाणीटंचाई मोठ्या प्रमाणांवर असून पूर्वी एवढा त्रास होत नव्हता. पाण्याचे नियोजित वेळापत्रक नाही. अपुरा पाणीपुरवठा असल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन पाणीपुरवठा सुरळित करून आम्हाला होणाऱ्या मानसिक त्रासातून मुक्त करावे''

- राजाराम वीर, स्थानिक नागरिक कात्रज

loading image