नयनरम्य धुके पिकांच्या मुळावर

जयदीप हिरवे
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात गेले तीन ते चार दिवस पहाटेच्या वेळी सर्वत्र धुके पडत आहे. त्यातच संध्याकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कांदा पिकासह इतरही पिकांना याचा फटका बसला आहे.

सातगाव पठार (पुणे) : सातगाव पठार (ता. आंबेगाव) परिसरात गेले तीन ते चार दिवस पहाटेच्या वेळी सर्वत्र धुके पडत आहे. त्यातच संध्याकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कांदा पिकासह इतरही पिकांना याचा फटका बसला आहे.

सातगाव पठार परिसरात परतीच्या पावसाचा जोर वाढला असतानाच गेले तीन ते चार दिवस रोज पहाटे सगळीकडे दाट धुके पडते. हे चित्र पाहण्यासाठी नेत्रसुखद असले तरी शेतकऱ्यांच्या मुळावरच उठणारे आहे. त्यामुळे भल्या पहाटे शेतकरी जेव्हा आपल्या शेतात फेरफटका मारायला जातात तेव्हा हे धुके पाहून त्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडत आहे.

सातगाव पठार परिसरातील बटाटा पिकाच्या काढणीची कामे संपली असली तरी हे काढलेले बटाटे शेताच्या कडेला आरण लावून ठेवलेले आहेत. त्यामुळे रोज येणाऱ्या पावसाने ते भिजून नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यातच नुकतीच या भागात शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. दररोजच्या पावसामुळे शेतातील लागवड केलेली कांदा रोपे पाण्याखाली जात आहेत. त्यातच धुके पडत असल्याने हे पीक रोगाला बळी पडू शकते. कारण धुके पडले की कांदा पीक हाताला लागत नाही, असा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव आहे. भल्या पहाटे पडलेले धुके व उगवतीच्या सुर्योदयाचे रंग त्यावर पडल्यामुळे वरवर हे दृश्‍य मोहक वाटत असले तरी शेतकऱ्यांच्या जिवाला घोर लावणारे आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops Affected Due To Fog