वर्षभरापूर्वी मुलगा गेला, आता पीक गेलं

Nuksan
Nuksan

पिरंगुट (पुणे) : कर्तासवरता एकुलता एक मुलगा वर्षभरापूर्वीच गेला. सासू-सून रोज कुणाच्या तरी शेतात मोलमजुरी करतात. सासू-सुनेच्या रोजगारावरच त्यांचा प्रपंच चालतो. दोन शालेय नातवंडांच्या शिक्षणासाठीही पैशांअभावी परवड होते. स्वतःच्या तुटपुंज्या शेतातील भातपिकाच्या जिवावर थोडीशी मदत व्हायची. पण या वर्षी निसर्गराजा कोपला आणि तेही भातपीक हिरावून घेतले. ही व्यथा आहे आंबेगाव (ता. मुळशी) येथील नारायण दगडू कानगुडे या शेतकऱ्याची.

नारायण कानगुडे यांचा एकुलता एक मुलगा योगेशचे निधन झाले. नारायण कानगुडे यांची पत्नी शोभा आणि त्यांची सून आशा या दोघी स्वतःच्या शेतातील कामे करता करता अन्य शेतात मोलमजुरी करून घर चालवतात. अनुष्का ही नात सातवीत तर आर्यन हा नातू सहावीत शिकतोय. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट असूनही या सासू-सुनेच्या जिवावर संसार चाललेला असतो. या वर्षी त्यांच्या शेतात पहिल्या पावसापासूनच शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे भात लागवड करताच आली नाही. त्यातूनही एका कोपऱ्यात उपलब्ध जागेत थोडी भात लागवड केली आणि अतिवृष्टीने जोमात आलेल्या पिकावर पाणी फेरले. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावून घेतला आणि कानगुडे कुटुंबाला केवळ मोलमजुरी करण्याची वेळ आलीय.

या वर्षी अशीच परिस्थिती तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांवर ओढवलेली आहे. त्यामुळे लाखोंचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे. तालुक्‍यातील मुठा, रिहे, माले तसेच कोळवण खोऱ्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे. दोनदा झालेल्या अतिवृष्टीने भातपिकांसह शेतजमीन वाहून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील भात पीक काढणीला आलेले असून या ढगफुटीसदृश प्रकारामुळे शेतातील उभ्या पिकावर डोंगरातून वाहून आलेले दगड, गोटे, माती, झाडे यांचा थरच बसला. बहुतांशी भात पीक माती आणि दगडगोट्यांखाली गाडल्याने मोठे नुकसान झालेले आहे. अजूनही पावसाने पाठ सोडली नसल्याने शेतात पाणी साचून राहिलेले असते. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकाची कापणी कशी करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. अनेक शेतातील भाताचे पीक झडून आणि सडून चाललेले आहे.
सरकारने शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई तातडीने द्यावी. लालफितीत अथवा तांत्रिक बाबींमध्ये न अडकता ही मदत शेतकऱ्यांपर्यंत विनाविलंब पोच व्हावी, असे आंबेगावचे सरपंच नंदूशेठ मारणे म्हणाले.

या वर्षी तालुक्‍यात एकूण आठ हजार हेक्‍टर क्षेत्रात भात लागवड केलेली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या पहिल्या अतिवृष्टीत तालुक्‍यातील सुमारे साडेसहाशे हेक्‍टर क्षेत्रावरील भात पिकांचे नुकसान झाले होते. या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दीडशे हेक्‍टर क्षेत्राला फटका बसला आहे. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार सध्यातरी या वर्षीच्या हंगामात तालुक्‍यातील सुमारे आठशे हेक्‍टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झालेले आहे. अजूनही पाऊस थांबला नाही तर नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे.
- कुडल हसरमणी, तालुका कृषी अधिकारी, मुळशी

अतिवृष्टीने यंदा मढं पीक आलेले आहे. खाताही येत नाही आणि टाकताही येत नाही. शेतात पाणी साचल्याने कापणी करून मळणीपर्यंत हे पीक किमान दोनदा उचलावे लागणार. शेतात कापणी करून प्रथम ते बांधावर अथवा कोरड्या जागेत वाळविण्यासाठी प्रथम उचलावे लागणार. त्यानंतर मळणीसाठी पुन्हा उचलावे लागणार. त्यामुळे दोनदा उचलल्यावर त्याचे दाणे हातात किती राहणार हा मोठा प्रश्न आहे.''
- रोहिदास मारणे, शेतकरी व माजी सरपंच

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com