साईरंग डेव्हलपर्सकडून कोट्यवधींची फसवणूक

साईरंग डेव्हलपर्सकडून कोट्यवधींची फसवणूक

पुणे : पैसे घेऊनही जमिनीचे खरेदीखत करून न देता नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल साईरंग डेव्हलपर्सविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले आहेत. 

यशवंत वसंतराव देशपांडे (वय 53, रा. पाषाण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किझुक्कुम परमबील मलिक ऊर्फ के. आर. मलिक (वय 56, रा. बाणेर) याच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

जागा खरेदीची जाहिरात पाहून देशपांडे यांनी नोव्हेंबर 2004 मध्ये साईरंग डेव्हलपर्सशी संपर्क साधला. मलिक याने त्यांना मुळशीतील माणगाव येथे जागा दाखवली. ती पसंत पडल्याने त्यांनी मलिकला सहा लाख रुपयांची आगाऊ रक्कम दिली. त्यानंतर देशपांडे यांनी मलिककडे खरेदीखत करून देण्याची मागणी केली. मात्र, मलिक टाळाटाळ करू लागल्याने देशपांडे यांनी पोलिसांत धाव घेतली. 

दरम्यान, अशा प्रकारे मलिकने राणा रणधीर सिन्हा, कर्नल अमरकुमार सिन्हा, सुदर्शन सिंग, प्रज्ञा सिंह, इक्‍बाल सारंग, अमिताभ रे, अनुराग दवे, रवींद्रकुमार मिश्रा आदींची फसवणूक केल्याचे उघड झाले. मलिकविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे 12 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका प्रकरणामध्ये त्याला जामीन मिळाला. मात्र, उर्वरित 11 गुन्ह्यांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित करत आरोपीला पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. 

एका गुन्ह्यात जामिनावर सुटका 

मलिकने श्रीकांत दिनकर लांडगे (वय 37, रा. पिंपळे सौदागर) यांचीही 12 लाखांची फसवणूक केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून मलिकला 29 डिसेंबरला अटक झाली होती.

दरम्यान, मलिकने लांडगे यांची रक्कम परत केल्याने न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली, असे चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी सांगितले. अशा पद्धतीने फसवणूक झाली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com