गर्दी अन्‌ घोषणाबाजी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

भेटीगाठीने प्रचाराची सांगता
कोथरूड क्षेत्रीय कार्यालय 

पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करताना सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, दुचाकीवरून रॅली, कोपरा सभा, सोसायटींमधील मतदारांशी संपर्क अशा विविध मार्गांचा अवलंब करीत प्रभागातील परिसर ढवळून काढला. 

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील तीन प्रभागात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात लढत होत आहे. या पक्षांच्या उमेदवारांच्या जोरदार प्रचारामुळे वातावरण निवडणूकमय होऊन गेले होते.

भेटीगाठीने प्रचाराची सांगता
कोथरूड क्षेत्रीय कार्यालय 

पुणे - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करताना सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, दुचाकीवरून रॅली, कोपरा सभा, सोसायटींमधील मतदारांशी संपर्क अशा विविध मार्गांचा अवलंब करीत प्रभागातील परिसर ढवळून काढला. 

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील तीन प्रभागात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात लढत होत आहे. या पक्षांच्या उमेदवारांच्या जोरदार प्रचारामुळे वातावरण निवडणूकमय होऊन गेले होते.

केंद्रीय मनुष्यवळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या भागातील प्रभागामध्ये केळेवाडी येथे सकाळी प्रचार सभा घेतली. तसेच, सोसायटीतील रहिवाशांच्या बैठकीत संवाद साधला. भाजपच्या उमेदवारांनी पदयात्रा, तसेच मोटारसायकल रॅली काढून मतदारांशी संपर्क साधला. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक ११ मध्ये मोठी पदयात्रा काढली. त्यांनी वस्ती भागातील, तसेच सोसायटीतील भागातील मतदारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रभाग दहामध्ये मोटारसायकल रॅली काढली.

शिवसेनेच्या उमेदवारांनी सकाळी पदयात्रा काढून प्रभागातील वातावरण ढवळून काढले, त्याचबरोबर दुपारी सोसायट्यांमध्ये भेटीगाठी घेत प्रचाराची सांगता केली. मनसेच्या उमेदवारांनीही पदयात्रा, तसेच मोटारसायकल रॅलीद्वारे मतदारांना मते देण्याचे आवाहन केले.

सर्वच पक्षाच्या उमेदवारांचे एकत्रित प्रचार, तसेच पदयात्रांमुळे या परिसरांतील सर्व वातावरण निवडणूकमय झाले होते. कार्यकर्ते सायंकाळपासून मतदारांना स्लिपा देण्यासाठी कार्यरत झाले. 

टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय
रस्त्यांवर पदयात्रा अन्‌ औक्षण

वाजत-गाजत रस्त्या-रस्त्यांवरून निघालेल्या पदयात्रा, जागोजागी त्यांना होणारे औक्षण आणि त्याच वेळी पक्षाच्या, तर काही ठिकाणी उमेदवाराच्या नावाने होणारा जयघोष आणि घरोघरी जाऊन मतदानाच्या स्लिपा वाटणारे वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते अशा वातावरणात प्रचाराचा समारोप होत असल्याचे दृश्‍य दत्तवाडीसह सिंहगड रस्त्यावरील प्रभागात रविवारी जागोजागी दिसत होते.

महापालिकेची निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २१) मतदान होत आहे. रविवारी सायंकाळी जाहीर प्रचाराचा समारोप अभिनव पद्धतीने करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाने केलेला दिसला. आजच्या सुटीचा फायदा घेत घरी असलेल्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचा कसोशीने प्रयत्न उमेदवार करत असल्याचे चित्र परिसरातील प्रभागांत दिसत होते. सकाळी लवकरच उमेदवारांच्या पदयात्रा रस्त्यारस्त्यांवरून निघाल्या होत्या. उमेदवाराच्या नावाने झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमत होता. काही उमेदवारांनी पदयात्रांमध्ये सुरवातीला तालवाद्यांच्या पथकाची साथ घेतली होती. त्यामुळे प्रचारात वेगळेच चैतन्य निर्माण झाल्याचा अनुभव मतदारांना येत होता. प्रचाराची ही धामधूम दुपारपर्यंत सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडी-जनता वसाहत, हिंगणे-सनसिटी आणि वडगाव बुद्रुक -धायरी या प्रभागांनी अनुभवली. दुपारी उन्हाचा चटका वाढल्याने या पदयात्रींनी विश्रांती घेतली. मात्र रिक्षांमधून होणारा प्रचाराचा जोर कायम होता. याच्या जोडीला ‘एलईडी’ पडद्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणे दाखविली जात होती. भाजपने पदयात्रांवर भर देत सोसायट्यांमधील मतदारांपर्यंत पोचण्याला प्राधान्य दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीही पदयात्रा काढल्या. या प्रचाराला उडत्या चालीच्या गाण्यांची साथ मिळाली आहे. 

दिवसभर प्रचाराचा ‘माहोल’
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय 

कार्यकर्त्यांच्या दुचाकींना लावलेले झेंडे, भोंगा लावून मत देण्याचे आवाहन करत फिरणाऱ्या रिक्षा, गल्ली-बोळांत काढलेल्या पदयात्रा आणि मतदारांच्या नावाच्या स्लीप वाटणारे कार्यकर्ते, असे चित्र कोंढवा, येवलेवाडी आणि अप्पर इंदिरानगर भागात रविवारी दिसले. 

प्रचारासाठी शेवटचा दिवस आणि त्यात रविवारची सुटी या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयांबाहेर मोठी गर्दीसुद्धा दिसत होती. प्रत्येक प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह काही अपक्षांनीही रविवारी जोरदार प्रचार करत प्रभागाच्या कानाकोपऱ्यात ‘शेवटचा हात’ फिरविण्याचा प्रयत्न केला. 

सकाळी ऊन कमी असल्यामुळे रॅली आणि पदयात्रा यावर उमेदवारांनी जोर दिला होता. त्यानंतर दुपारी ऊन वाढल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. मात्र टेंपो व रिक्षांद्वारे मतदारांपर्यंत पोचण्याचा विविध पक्षांच्या उमेदवारांच्या आटापिटा सुरूच होता.

शिवजयंतीनिमित्त करण्यात आलेल्या कार्यक्रमांसह प्रचारासाठी उतरलेल्या कार्यकर्त्यांमुळे रविवारी दिवसभर निवडणुकीचा ‘माहोल’ होता. 

घराबाहेर न पडणाऱ्या मतदारांपर्यंत पोचण्यासाठी शेवटच्या दिवशी अनेक एसएमएस, व्हॉट्‌सॲप संदेश, ‘ऑटोमेटेड कॉल’ आणि प्रत्यक्ष कॉल सेंटरमधून केले जाणारे दूरध्वनी याचेही प्रमाण लक्षणीय होते. त्यामुळे ‘निवांत’ रविवारी सकाळ आणि दुपारची झोप हे अनेक मतदारांचे गणित मात्र आज चुकले.

तरुणाईचा मतदारांशी संवाद
कसबा-विश्रामबागवाडा  क्षेत्रीय कार्यालय 

पक्षाचा झेंडा हाती घेऊन मतदारांशी संवाद साधणारी तरुणाई, ढोलताशांच्या गजरात प्रभागांमधून निघालेल्या पदयात्रा, मतदारांकडे पाहून अभिवादन करणारे उमेदवार... तर येऊन येऊन येणार कोण ?....यांच्याशिवाय आहेच कोण... अशा घोषणा देत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करणारे कार्यकर्ते आणि उमेदवार... उमेदवारांच्या प्रचारार्थ गल्लीबोळात फिरणाऱ्या रिक्षा... सर्वधर्मीय नागरिकांकडूनही प्रचारफेरीत सहभाग हे चित्र रविवारी कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभागांत पाहायला मिळाले.

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत. पक्ष पुरस्कृत आणि बंडखोर उमेदवारही नशीब अजमावत आहेत. अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधायचा म्हणून भाजप, मनसे, शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढल्या. शिवजयंतीमुळे घराबाहेर पडलेले कार्यकर्ते उमेदवारांसोबत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत होते. उच्चशिक्षित कार्यकर्त्यांचा एक गट प्रभाग १५ मधील मतदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगत होता. शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होऊन वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवारही मतदारांशी संवाद साधत होते. निवडणुकीसाठी उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयात दुपारी बारापर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी होती. त्यानंतर मात्र थकलेल्या कार्यकर्त्यांनी काहीशी विश्रांती घेतली, तर काही कार्यकर्ते मतदारांना स्पिलांचे वाटप करीत होते.

उमेदवारांकडून प्रचाराचा धुराळा
भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय 

घड्याळ, कमळ, पंजा, धनुष्यबाण, हत्ती, काठी, कॅमेरा, इंजिन इत्यादी निवडणूक चिन्ह एकापाठोपाठ एक भवानी पेठेतील गल्लीबोळातून रविवारी फिरत होते. विविध पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा व रॅलींचे आयोजन परिसरात प्रचाराचा धराळा उडवून दिला. सकाळी सुरू झालेला हा प्रचार सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता. 

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक १८, १९ आणि २० असे तीन प्रभाग येतात. हा सर्व पेठांचा आणि वर्दळीचा परिसर आहे. रविवार असल्यामुळे दुकाने बंद असल्याने अनेक जण जवळच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरल्याचे  चित्र होते. 

तिन्ही प्रभागातील बारा जागांसाठी जवळपास शंभरहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी ताकद पणाला लावली होती. पदयात्रा व रॅली मोठ्या प्रमाणावर निघाल्यामुळे गल्लीबोळात प्रचाराचा धुरळा उडाला होता. 

गळ्यात पक्षाचे उपरणे, डोक्‍यावर टोप्या, हातात झेंडे आणि उमेदवारांच्या नावाच्या घोषणांनी परिसरात दणाणून सोडत होते. काही मिनिटांच्या फरकाने विविध पक्षांच्या रॅली परस्परांजवळ येत होत्या. 

अपक्ष उमेदवारही सर्व ताकदपणाला लावून प्रचारात सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांच्या पाणी, आणि नाश्‍ता व भोजनाची सोय उमेदवारांनी केली होती. परिसरातील मतदारांना दिवसभर उमेदवार व कार्यकर्त्यांकडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते.

मावशी, हे बटण दाबायचे बरं!
आैंध क्षेत्रीय कार्यालय 
सकाळी दारावर पडलेली थाप अन्‌ ‘मावशी...हे बटण दाबायचे बरं का !’ असे सांगत दारात उभे असणारे उमेदवार... सुवासिनींकडून त्यांचे होणारे औक्षण...पदयात्रेसह दुचाकी व चारचाकींच्या विविध पक्षांच्या निघालेल्या रॅली... ढोल-ताशांच्या गजरात लाउड स्पीकरवर होणाऱ्या घोषणाबाजी...अशा वातावरणामुळे औंध, बाणेर, बालेवाडी, बोपोडी, पाषाण येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रंगत वाढल्याचे पाहायला मिळाले.

औंध-बोपोडी (क्र. ८) आणि बाणेर-पाषाण (क्र. ९) या प्रभागांत रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच प्रचाराला सुरवात झाली.  सोसायट्यांमध्ये, चहाच्या टपरीवर, उद्यानांमध्ये ‘कोणाला मत द्यावे, कोण चांगला ठरेल, कोण आपली कामे करेल,’ याबाबत चर्चा रंगल्याचे दिसून येत होते. काही ठिकाणी मतदारही आपल्या उमेदवारांशी आपुलकीने संवाद साधत होते. औंध-बोपोडी परिसरात भाजपच्या प्रभात फेरीत आणि पदयात्रेत मुस्लिम महिलांचाही सहभाग होता. याच परिसरात प्रचारफेरीत उंटावरून भगवा फडकाविल्याचेही चित्र दिसून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे या पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवारांनीही दारोदारी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. गल्लीबोळातून ‘आपला माणूस, आपला विकास’ अशा घोषणा देणाऱ्या रिक्षाही फिरत होत्या. विविध पक्षांचे कार्यकर्ते रविवारी रणरणत्या उन्हात रस्त्यावर आपल्या ‘भाऊ’चा आणि ‘ताई’चा प्रचार करताना दिसत होते. आपल्याच रॅलीत सर्वाधिक गर्दी खेचून आणून शक्तिप्रदर्शन करण्याचा ‘ट्रेंड’ शेवटच्या दिवशीही पाहायला मिळाला. 

उन्हाच्या कडाक्‍यातही ‘कडक’च!
येरवडा क्षेत्रीय कार्यालय 
सकाळी सात वाजताच गळ्यात उपरणे, हातात झेंडे व डोक्‍यावर पक्ष चिन्हाची टोपी परिधान केलेले कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. हजारो कार्यकर्त्यांचा समुदाय दुचाकी, चारचाकी व महागड्या गाड्यांवर बसून ताई, भाऊंच्या नावाने घोषणा देत होता. उन्हाच्या कडाक्‍याकडे दुर्लक्ष करत उमेदवार व शेकडो कार्यकर्त्यांनी दिवसभर ‘नॉनस्टॉप’ प्रचार केला. राजकीय पक्ष व अपक्षांच्या झेंड्यांमुळे ठिकठिकाणचा परिसर विविध रंगांमध्ये न्हाऊन निघाला. दुसरीकडे ‘रोड शो’मधील वाहनांच्या ताफ्यामुळे सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागल्याचे चित्र रविवारी प्रभागांमध्ये दिसून आले.  

कळस-धानोरी (प्रभाग १), फुलेनगर-नागपूर चाळ (प्रभाग २) व येरवडा (प्रभाग ६) या प्रभागांमधील मतदारांची रविवारची सकाळ उजाडली तीच, हात जोडून दारात उभ्या राहिलेल्या उमेदवारांच्या उपस्थितीने. बहुतांश उमेदवारांनी सकाळी सात वाजताच आपल्या प्रभागातील मोठ्या सोसायट्या, वसाहती, मैदाने व उद्यानांमध्ये जाऊन मतदारांना भेटी दिल्या. आठ वाजल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘रोड शो’ची तयारी केले होती. त्यामध्ये तरुणांसह महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती. खुल्या जीपमध्ये उमेदवार, तर जीपभोवती कार्यकर्त्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या गर्दीने ‘रोड शो’ आणि पदयात्रा, कोपरा सभांद्वारेही उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोचण्यास प्राधान्य दिले. ऊन वाढल्यानंतर उमेदवारांनी ‘प्रचार करतच थोडसं खाऊ, म्हणजे प्रचार वेळेत संपविता येईल,’ अशा शब्दांत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.  भगवे, निळे, पिवळे झेंडे, घड्याळ, कमळ, धनुष्यबाण, पंजाबरोबरच अपक्षांचे चिन्ह हाती घेतलेले कार्यकर्ते अनेकदा समोरासमोर आले. दुपारी तीन वाजल्यानंतर तर प्रचार शिगेला पोचला. 

औक्षण अन्‌ ‘बेस्ट ऑफ लक’
सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय 

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मतदारांना ‘आमच्यावर लक्ष राहू द्या बरं का’, अशा शब्दांत उमेदवारांकडून साधला जाणारा संवाद... सुटीच्या दिवशी मतदार घरी असतात. त्यामुळे दारोदारी जाऊन मतदारांसमोर जोडले जाणारे उमेदवारांचे हात... त्यांचे कुठे सुवासिनींकडून होणारे औक्षण तर कुठे मिळणाऱ्या केवळ कोरड्या शुभेच्छा... उमेदवाराच्या हसतमुख चेहऱ्यामागे शेकडो कार्यकर्त्यांची रॅलीत दिसणारी गर्दी, घोषणाबाजी अन्‌ वेगवेगळ्या रंगांचे फडकणारे ध्वज... अशा वातावरणामुळे शेवटच्या दिवसाच्या प्रचारात चांगलीच रंगत आली होती.

सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सॅलिसबरी पार्क- महर्षीनगर (प्रभाग क्र. २८), सहकारनगर- पद्मावती (प्रभाग क्र. ३५), मार्केट यार्ड- लोअर इंदिरानगर (प्रभाग क्र. ३६) या भागात रविवारी पहाटे पाच वाजल्यापासूनच प्रचाराला सुरवात झाली होती. बागा, टेकड्या, मोकळी मैदाने या परिसरात जाऊन वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार मतदान करण्याची आठवण मतदारांना करून देत होते. मतदारही त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत होते. प्रभातफेरी झाल्यानंतर मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षाच्या उमेदवारांबराबेरच अपक्ष उमेदवारांनी सोसायट्यांमध्ये जाऊन घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला. 

या पक्षाच्या उमेदवाराच्या रिक्षाही सोसायट्यांमध्येही फिरत होत्या.प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने कोपरा सभा टाळून उमेदवारांनी रॅलीवर भर दिल्याचे दिसत होते. त्यामुळे बिबवेवाडी, शिवदर्शन, सहकारनगर भागात सकाळच्या वेळात वाहतूक कोंडी झाली होती. काँग्रेसच्या उमदेवारांनी पदयात्रा काढून मतदारांचे लक्ष वेधून घेतले तर ढोल- ताशाचा दणदणाट करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून रॅली काढली. या दोन्ही रॅलीत महिला मोठ्या प्रमाणात दिसल्या. 

घरोघरी मतदारांच्या भेटीवर भर
हडपसर क्षेत्रीय कार्यालय 

घरोघरी जाऊन मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी, पदयात्रा, दुचाकी रॅलीमुळे मुंढवा-मगरपट्टासिटी, हडपसर गावठाण- सातववाडी आणि कोरेगावपार्क- घोरपडी या प्रभागांमधील वातावरण रविवारी दिवसभर ढवळून निघाले. प्रचाराचा शेवटचा दिवस आणि साप्ताहिक सुटीचे निमित्त साधत, विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत, संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. प्रभागात केलेली कामे, भविष्यातील प्रकल्प मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी घरोघरी पत्रके वाटण्याचा धडाकाही कार्यकर्त्यांनी लावला. 

कोरेगाव पार्क- घोरपडीतील (प्रभाग २१) उमेदवार सकाळी आठ वाजल्यापासून घराबाहेर पडले. त्यानंतर परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी जाऊन मते देण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी पदयात्रा, दुचाकी रॅली काढून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. मुंढवा- मगरपट्टासिटीमधील (प्रभाग २२) राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी एकत्रित पदयात्रा काढून विजयी करण्याचे आवाहन केले. याच प्रभागातील भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. मनसे उमेदवारांनीही घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या.  

हडपसर गावठाण- सातववाडी येथील (प्रभाग २३) विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना मते देण्याचे आवाहन केले. तसेच, प्रत्येक मतदारांपर्यंत आपली कामे पोचविण्याच्या उद्देशाने पत्रकेही वाटली. त्यामुळे या प्रभागात सर्वत्र राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दिसत होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रभागांमध्ये प्रचाराची रणधुमाळी होती. 

सकाळपासून पायाला भिंगरी
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय 

वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या एरंडवणा-हॅपी कॉलनी प्रभाग (क्र. १३), कर्वेनगर  (क्र. ३१) तसेच वारजे-माळवाडी (क्र. ३२) या तीन प्रभागांत सर्वच उमेदवारांनी रविवारी सकाळपासूनच आपापला संपूर्ण भाग पिंजून काढायला सुरवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे या प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही अखेरच्या दिवशीच्या प्रचारात कसलीही कसर ठेवली नसल्याचे दिसून आले. अनेक उमेदवार तर जेवणखाण विसरून प्रचारात सलग सहा-सात तास सक्रिय होते.
मतदारांच्या मनात आपली अन्‌ आपल्या पक्षांची छबी कोरली जावी आणि त्याचे रुपांतर आपल्याला मिळणाऱ्या मतांमध्येही व्हावे, यासाठी आजचा सुटीचा दिवस सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरला. पदयात्रा, दुचाकी रॅली, चारचाकी रॅली, सायकली, रिक्षा, टेम्पो असे सारे काही उपलब्ध मार्ग अन साधनं वापरून प्रचार करण्यात आला. यात तरुणांसोबतच अनेक ठिकाणी महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. 

राष्ट्रवादी आणि भाजप तसेच काही प्रमाणात शिवसेनेने दुचाकी रॅलीवर भर दिल्याचे दिसले, तर काँग्रेस आणि मनसे यांनी घरोघरी जात मतदारांच्या भेटी घेत प्रचार करण्यावर भर दिला होता.

हवेत फडकणारे झेंडे, मोठमोठाले बॅनर्स, उमेदवारांचे छायाचित्र असणारे फलक अशा विविध मार्गांनी केला जाणारा ‘मूक प्रचार’... आणि मोठ्या चारचाकींवर लावलेले मोठ्ठे स्क्रीन्स आणि प्रोजेक्‍टर्स, रिक्षांमधून सर्वत्र फिरवल्या जात असलेल्या रेकॉर्डिग्ज, कार्यकर्त्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा अशा मार्गांनी केला जाणारा ‘बोलका प्रचार’, असे दोन्ही प्रकार आज पाहायला मिळत होते. विशेष म्हणजे, दुपारी कडकडीत उन्हातही प्रचार सुरूच होता.

Web Title: The crowd and shouted slogans