मांढरदेवीला दर्शनासाठी जाताय; तर मग हे वाचाच...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

घाटाच्या पायथ्याशी सर्व गाड्यांची तपासणी करून त्यामधील साहित्य काढून ठेवले जात आहे. परिवहन महामंडळाच्या भोर आगाराकडून एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत.

भोर (जि. पुणे) : मांढरदेव (ता. वाई, जि. सातारा) येथील श्री काळुबाई (मांढरदेवी) देवीच्या यात्रेचा आज मुख्य दिवस असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी झाली आहे. कोणताही अपघात होऊ नये किंवा दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.

पुण्याहून भोर मार्गे मांढरदेवीला जाताना अंबाड खिंड हा अवघड घाट आहे. म्हणून शासनाच्या महसूल, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, पंचायत सामिती, पशुसंवर्धन व परिवहन विभागाकडून  देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

हेही वाचा - शिक्षक कंटाळले गटबाजीला ; लढाई सुरुच ठेवणार

प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (ता. ९) पासून शासनाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत झाले आहेत. २४ जानेवारीपर्यंत हे कामकाज सुरू राहणार आहे.
आरोग्य विभागाकडून घाटाच्या पायथ्याशी आपत्कालीन कक्ष उभारण्यात आला आहे.

यात्रेच्या कालावधीत मध्यपान मांसाहार लिंबू वरखेडे ठोकणे आदींसाठी पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे घाटाच्या पायथ्याशी सर्व गाड्यांची तपासणी करून त्यामधील साहित्य काढून ठेवले जात आहे. परिवहन महामंडळाच्या भोर आगाराकडून एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत.

सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत या गाड्या सुरू राहणार आहेत. खाजगी गाड्या घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि यात्रेच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

ही वाचा -  पाटण (जि.सातारा) : बिबट्या पून्हा आला... अन्

भोर तहसील कार्यालय येथे 24 तास आपत्कालीन कक्ष सुरू राहणार आहे. भोरमधील सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्सचे जवानही शासनाच्या मदतीला कार्यरत आहेत. भाविकांनी संकटकाळी आपत्कालीन कक्ष क्रमांक भोर पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowds of devotees to see Mandhar Devi in satara district