सुसंस्कृत आदिवासी हीच आमची प्रेरणा - डॉ. प्रकाश आमटे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

खायला अन्न नसले तरी भुकेला नाही, गरिबी आहे; पण कधीही चोरी केली नाही, ज्या समाजात कधीही बलात्कारासारखे प्रकरण घडले नाही, असा सुसंस्कृत आदिवासी समाज हीच आमची प्रेरणा आहे, असे मत डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी व्यक्त केले.

पुणे - खायला अन्न नसले तरी भुकेला नाही, गरिबी आहे; पण कधीही चोरी केली नाही, ज्या समाजात कधीही बलात्कारासारखे प्रकरण घडले नाही, असा सुसंस्कृत आदिवासी समाज हीच आमची प्रेरणा आहे, असे मत डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्रात(एनसीसीएस) शुक्रवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान अकादमी (नासी) पुणे विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे, अकादमीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष डॉ. जी. सी. मिश्रा, एनसीसीएसचे संचालक डॉ. गोपाल कुंडु, दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र संशोधक प्रा. डॉ. परमजित खुराना उपस्थित होत्या. 

नागपूर ते हेमलकसा जीवनप्रवास उलगडून सांगताना डॉ. आमटे म्हणाले, ‘‘वकिली आणि राजकारणात शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देता येत नाही, म्हणून आमच्या बाबांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेत आयुष्य समर्पित केले. तरीही स्वतः डॉक्‍टर नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणी आल्या. याचा विचार करूनच आम्ही दोघा भावांनी मेडिकलचा अभ्यास करून बाबांचे काम पुढे चालू ठेवायचे, असे ठरविले; परंतु बाबांची दूरदृष्टी मोठी होती. त्यांनी आम्हाला भामरागडला फिरायला नेले. तेथील आदिवासी समाजाची मागासलेली अवस्था बघून त्यांच्या सेवेचे वचन मी बाबांना दिले. त्यातूनच नकळत हेमलकसा प्रकल्प उभा राहिला.’’

‘आधुनिक माणसाच्या जवळही न येणारा आदिवासी समाज आज शिक्षणाबद्दल आग्रही बनला आहे. भामरागडच्या लोकबिरादरी प्रकल्पात आज साडेसहाशे मुलांची निवासी शाळा चालविली जाते. शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक सर्व सुविधांनी सुसज्ज दवाखाना हेमलकश्‍यात कार्यरत आहे,’’ असे डॉ. आमटे यांनी सांगितले.

आपल्या घरात राहत असलेल्या वन्यप्राण्यांबद्दल बोलताना डॉ. आमटे म्हणाले, ‘‘आदिवासींनी मारलेल्या वन्यप्राण्यांची पिल्ले पाळायला सुरवात केली. त्यातूनच वाघ, हरिण, मगर, साप आदी वन्यप्राण्यांचा गोतावळा उभा राहिला. त्यांच्या सोबतच्या सहवासामुळे माझा विश्‍वास दोन पायाच्या प्राण्यांपेक्षा चार पायाच्या प्राण्यांवर अधिक वाढला आहे.’’
आभार डॉ. मिश्रा यांनी मानले.

Web Title: The cultured tribal is our inspiration Prakash Amte