आळंदीत उद्यापासून संचारबंदी ; धर्मशाळा, लॉजिंगमध्ये निवासास बंदी

विलास काटे
Saturday, 5 December 2020

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (८ डिसेंबर) पासून भरणार आहे. कार्तिकी वद्य एकादशी (११ डिसेंबर) ला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी (ता. १३ डिसेंबर) ला आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिलेल्या आदेशामुळे आता कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी, चऱ्होळी खुर्द, केळगाव, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ आणि पिंपरी महापालिका हद्दीतील चऱ्होळी बु. डुडूळगाव या गावामधे अत्यावश्य सेवा वगळता इतरांना संचारबंदी आहे

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीतील कार्तिकी वारीकरिता  आळंदी आणि पंचक्रोशीत रविवार (ता.६) पासून मंगळवारी (ता.१५) पर्यंत आळंदीत येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करून संचारबंदीचा आदेश  जिल्हाधिकारी डॉ.राजेंश देशमुख यांनी दिला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (८ डिसेंबर) पासून भरणार आहे. कार्तिकी वद्य एकादशी (११ डिसेंबर) ला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी (ता. १३ डिसेंबर) ला आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिलेल्या आदेशामुळे आता कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी, चऱ्होळी खुर्द, केळगाव, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ आणि पिंपरी महापालिका हद्दीतील चऱ्होळी बु. डुडूळगाव या गावामधे अत्यावश्य सेवा वगळता इतरांना संचारबंदी आहे. संचारबंदी काळात हॉटेल, लॉजिंग, धर्मशाळेत रहिवास करण्यास पूर्ण बंदी आहे.

अगोदर जे निवास करून आहेत त्यांना आळंदीबाहेर जाण्यास सांगितले. आळंदीला येणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी असून प्रवाशी वाहतूक बंद राहिल. तर मरकळ, शिक्रापूर चाकणकडे जाणारी औद्योगिक वाहने आळंदीतून न येता चऱ्होली आळंदी बायपास आणि पुणे नगर महामार्गावरून वळविण्यात येतील. कामगार वर्गाने नियुक्तीचे ओळखपत्र,आधारकार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे. 

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

आळंदी देवस्थानचे विश्वस्त अॅड विकास ढगे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदीचा आदेश पाळून यात्रा पार पाडली जाईल. वारक-यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी देवूळवाड्यात थर्मल स्कॅन करून प्रवेश दिला जाईल. देवूळवाड्यात ८ डिसेंबरला महाद्वारातील गुरू हैबतबाबा पायरीपूजनासाठी तिस लोकांना परवानगी आहे. कार्तिकी एकादशी(११ डिसेंबर) पहाटपूजेकरीता आणि माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यासाठी पन्नास लोकांना मंदिर प्रवेश राहिल.

किर्तन जागरला साथ देण्यासाठी पंधरा टाळकरी परवानगी आणि परंपरेने सेवा करणा-या कुटूंबातील पाच व्यक्तींनाच प्रवेश आहे. सेवा झाली की लगेच माघारी फिरावे लागणार आहे. माऊलींच्या समाधीवरिल महापूजा आणि दर्शन लाईव्ह स्वरूपात सोशल मिडिया आणि चॅनेलद्वारे दाखविले जाईल. तसेच वारी काळात पाचशे ते सहाशे वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, जिल्हाधिकारी देशमुख यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. 

१)इंद्रायणी नदीत स्नान करण्यास बंदी आहे. 
२)मंदिराबाहेर लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यास बंदी आहे.
३) मंदिरात येताना रॅपीड टेस्ट बंधनकारक.
४)अत्यावश्यक सेवा परवानगी. 
५)धर्मशाळा, लॉजिंगमधे निवासास प्रतिबंद. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curfew in Alandi from tomorrow Residence banned in Dharamshala Lodging