चलन तुटवडा कायम, रांगा कमी, एटीएम तासात खुडूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

पिंपरी - केंद्र सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा बॅंकांकडे पाठवल्या असल्या, तरी सुट्या शंभर रुपयांच्या नोटांची चणचण असल्याने समस्या कायम आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून शहरातील बॅंकेसमोर लागलेल्या ग्राहकांच्या रांगा कमी झाल्याचे चित्र शहरातील काही भागांत बुधवारी दिसले. मात्र, कामगार बहुल भोसरीत स्टेट बॅंकेच्या समोरची गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती. 

बॅंकांकडे पुरेशा प्रमाणात चलन न आल्याने अनेक एटीएम अद्याप मोकळेच आहेत. पैसे असलेल्या एटीएमसमोर लांब रांगा लागत आहेत. एटीएममध्ये अद्याप पाचशेच्या नवीन नोटा न आल्यामुळे पैशांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. ज्या एटीएममध्ये पैसे भरले जात होते, ते तासाभरात मोकळे होत असल्याचे चित्र होते. शहरातील दापोडी, बोपोडी, चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, बिजलीनगर, वाकड परिसरातील बॅंकांमध्ये दोन दिवसांपूर्वी मोठ्या रांगा लागल्या होत्या. आता त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. 

केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार बॅंकांमध्ये पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या बोटाला शाई लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बॅंकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्याची व्यवस्था केली आहे. पैसे भरणाऱ्या आणि काढणाऱ्या ग्राहकांच्या बोटाला प्रथम शाई लावण्यात येत होती. टपाल कार्यालयातही ही प्रक्रिया राबवण्यात येत होती. 

पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध नसल्यामुळे बॅंकेमध्ये येणाऱ्या ग्राहकांना कमी रक्‍कम काढण्याच्या सूचना बॅंकेचे अधिकारी देत होते. रांगेमध्ये थांबलेल्या प्रत्येकाला सुटे पैसे हवे होते. मात्र, सुट्या पैशांचा तुटवडा असल्यामुळे ग्राहकांना दोन हजार रुपयांची नोट घ्यावी लागत होती. पाचशेच्या नोटा पुरेशा प्रमाणात चलनात न आल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा त्रास कमी होईल, असे एका बॅंकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, नाशिक येथील टाकसाळीतून मोठ्या प्रमाणात पाचशे, शंभर, पन्नास आणि वीस रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅंकेमध्ये पाठविल्या आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यापर्यंत बहुतांशी सर्व बॅंकेतील रांगा कमी होऊन पुरेशा प्रमाणात चलन उपलब्ध होणार असल्याचे चिंचवड येथील राष्ट्रीयकृत एका बॅंकेच्या व्यवस्थापकाने सांगितले. 

Web Title: Currency shortage persists