रत्नागिरी हापूसऐवजी "कर्नाटक'ला ग्राहकांची पसंती ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

पुणे - अक्षयतृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी हापूस आंब्याला कमी मागणी असून, कर्नाटक हापूस आंब्याला ग्राहक पसंती देत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी असूनही रत्नागिरी हापूसला ग्राहकांनी पाठ दाखविली आहे. 

पुणे - अक्षयतृतीयेच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी हापूस आंब्याला कमी मागणी असून, कर्नाटक हापूस आंब्याला ग्राहक पसंती देत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी असूनही रत्नागिरी हापूसला ग्राहकांनी पाठ दाखविली आहे. 

अक्षयतृतीया शुक्रवारी (ता.28) असून, या मुहूर्तावर आंब्याची मागणी वाढत असते. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून कर्नाटक हापूस आंब्याची आवक चांगली होत आहे. रविवारी कर्नाटकातून सर्व प्रकारच्या आंब्याची एकूण 25 हजार पेटी इतकी आवक झाली होती. दरवर्षीच्या हंगामापेक्षा या वेळी ही आवक मोठी आहे. त्याचवेळी रत्नागिरी हापूसची आवक तुलनेत घटली आहे. याविषयी व्यापारी करण जाधव म्हणाले,"" पहिल्या बहारचा आंबा संपला असून, आता दुसरा बहार सुरू झाला आहे. या दुसऱ्या बहारातील आंब्याची आवक आता वाढत जाईल. अक्षयतृतीयेमुळे पुण्याप्रमाणेच इतर बाजारातही बागायतदार माल पाठवितात. त्याचा परिणाम आवकेवर झाला आहे. अक्षयतृतीयेनंतर आवक वाढेल आणि आणखी भाव कमी होण्याची शक्‍यता आहे. सध्या कच्चा मालाची आवक मर्यादित आहे. तसेच गेल्या आठवड्यात कच्च्या आंब्याची ज्यांनी खरेदी केली आहे, त्यांच्याकडे तयार आंबा उपलब्ध होत आहे.'' 

कोकणातील हापूस आंब्याच्या तुलनेत भाव कमी असल्याने कर्नाटक हापूस आंब्याला चांगली मागणी राहते, असे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले."" अक्षयतृतीयेच्या कालावधीत ग्राहकांना कर्नाटक हापूस चांगल्या प्रमाणात उपलब्ध होईल. हापूस आंब्याचे भाव परवडत नसणाऱ्या वर्गासाठी इतर प्रकारचे आंबेही रास्त भावांत उपलब्ध झाले आहेत.'' सध्या कच्च्या मालाची खरेदी ग्राहकांकडून होत आहे. व्यवस्थित पिकण्यास ठेवला, तर हा कच्चा माल चार ते पाच दिवसांत खाण्यास योग्य होईल. कच्च्या मालाच्या तुलनेत तयार आंब्याचे बाजारात प्रमाण कमी असल्याने तयार मालाचे भाव थोडे वधारण्याचा अंदाज आहे. 

आंबा पिकविण्यासाठी "भट्टी' 
मार्केट यार्ड येथील बहुतेक आंबा विक्रेत्यांनी आंबा पिकविण्यासाठी "भट्टी'लावली आहे. कच्च्या आंब्याच्या भावापेक्षा प्रतिडझनामागे तयार आंब्याचे भाव हे प्रतिनुसार 200 ते 300 रुपये इतका अधिक आहे. रत्नागिरी हापूस आंब्याचे (कच्चा) प्रतिनुसार ( 4 ते 10 डझन ) पेटीचे भाव 1 हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहेत. काही पेटीचे भाव हे तीन हजार रुपयांपर्यंतदेखील आहेत, तर कर्नाटक आंब्याचे (कच्चा) 3 ते 5 डझन पेटीचा भाव पाचशे ते हजार रुपये इतका आहे. 

Web Title: Customers like Karnataka instead of Ratnagiri Hapus mangp