ग्राहकांनो, गॅस सिलिंडर तपासणे हा तुमचा हक्क

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

डिलिव्हरी बॉयने सिलिंडरचे वजन अथवा गळतीची तपासणी केली की नाही, याबाबतची माहिती ग्राहकांना इंडियन ऑइल 
कंपनीला कळविता येणार आहे.

पुणे : ''स्वयंपाकाच्या गॅससिलिंडरचे वजन तपासणे आणि त्यातून वायुगळती होत आहे की नाही, हे जाणून घेण्याचा प्रत्येक ग्राहकाला अधिकार आहे. सिलिंडर घरपोच करणाऱ्या कर्मचाऱ्याने (डिलिव्हरी बॉय) या गोष्टी तपासणे त्याचे कर्तव्यच आहे,'' अशी माहिती इंडियन ऑइलचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी संचालक अमिताभ अखौरी यांनी दिली. 

इंडियन ऑइलच्या वतीने देशभरात ग्राहक सुरक्षा अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत शहरातील 140 गॅसवितरक आणि 80 गॅसवितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी अखौरी यांनी संवाद साधला. ग्राहकाला गॅससिलिंडर पोहोच करताना त्यांना खात्रीशीर वजन असलेला सिलिंडर मिळाला की नाही, याचे प्रात्यक्षिक गॅसवितरक कर्मचाऱ्याने दाखविणे बंधनकारक आहे. याबाबत इंडियन ऑइल कंपनीकडून जनजागृती करण्यात येणार आहे. 

'इंडियन ऑइलच्या गॅसचे वितरण करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे गॅसतपासणीची साधने असतील. याबाबत ग्राहकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी '1906' या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक सतीशकुमार थातीपेल्ली यांनी केले आहे. 

डिलिव्हरी बॉयने सिलिंडरचे वजन अथवा गळतीची तपासणी केली की नाही, याबाबतची माहिती ग्राहकांना इंडियन ऑइल कंपनीला कळविता येणार आहे. ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे लिंक पाठविण्यात येईल. त्याद्वारे ते आपला अनुभव कंपनीला कळवू शकतील. 
- सतीशकुमार थातीपेल्ली, महाव्यवस्थापक, इंडियन ऑइल कंपनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Customers you have the right to test the gas cylinder