मॅकडोनाल्डची फ्रॅन्चायझी देतो म्हणाले अन् साडे आठ लाख रुपयांना गंडवून गेले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

संबंधित व्यक्तींनी या कामासाठी विविध प्रकारच्या शुल्काच्या नावाखाली भापकर यांच्याकडून साडे आठ लाख रुपये वेळोवेळी विविध बॅंक खात्यांमध्ये भरण्यास भाग पाडले.

पुणे : मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायझी मिळवून देण्याचा बहाणा करून एका व्यावसायिकाची सायबर गुन्हेगारांनी तब्बल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 7 ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये खडकीत घडली. 

याप्रकरणी नामदेव भापकर (वय 47, रा. खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव भापकर हे व्यावसायिक आहेत. त्यांना व्यवसाय करण्यासाठी नामांकित मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायझी पाहिजे होती. त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर शोध सुरू केला होता. त्याचवेळी त्यांना काही अनोळखी व्यक्तींचा फोन आला. त्यांनी भापकर यांचा विश्‍वास संपादन करून त्यांना मॅकडोनाल्ड कंपनीची फ्रॅन्चायझी मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

महाराष्ट्रात जीओचाच डंका; एकाच महिन्यात जोडले ७ लाख नवे ग्राहक!

त्यानंतर संबंधित व्यक्तींनी या कामासाठी विविध प्रकारच्या शुल्काच्या नावाखाली भापकर यांच्याकडून साडे आठ लाख रुपये वेळोवेळी विविध बॅंक खात्यांमध्ये भरण्यास भाग पाडले. पैसे घेऊनही फ्रॅन्चायझी मिळत नसल्याने भापकर यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा करायला सुरवात केली. त्यावेळी त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शफील पठाण करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cyber criminals cheated businessman to Rs 8 lakh for acquiring a McDonald franchise