पैसे घेऊन मार्क वाढविणारा अधिकारी पोलिसांच्या ताब्यात; साथीदारांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या अनुषंगाने हेंगळे यांच्याकडून संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल संच, पेन ड्राईव्ह असे साहित्य जप्त करायचे आहे. गुन्हा करण्यासाठी त्यांनी आणखी काहीजणांची मदत घेतल्याचा संशय आहे.

पुणे : पैसे घेऊन 178 विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याप्रकरणी शहरातील एका नामांकित अभिमत विद्यापीठातील मूल्यांकन अधिकाऱ्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी त्यास 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांना म्हणतात...​

मूल्यांकन अधिकारी संदीप रामकृष्ण हेंगळे (वय 49, रा. गुलमोहोर अपार्टमेंट, नवश्‍या मारुती मंदिराजवळ, सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात सुमीत कुमार (रा. अंबरपेठ, हैदराबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. संबंधित विद्यापीठातील प्रमुख मूल्यांकन अधिकारी नामदेव कुंभार (रा. मॉडेल कॉलनी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
हेंगळे यांना सायबर पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले होते. हेंगळे, कुमार हे विद्यापीठात मूल्यांकन अधिकारी आहेत. दोघांनी 178 विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले. संगणकीय प्रणालीचा गैरवापर करून त्यांनी गुणवाढ दिली, असे सरकारी वकील ऍड. ज्ञानेश्वर मोरे यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

जेईई अॅडव्हान्स परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, 'या' महत्वाच्या टिप्स नक्की वाचा!​

या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या अनुषंगाने हेंगळे यांच्याकडून संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल संच, पेन ड्राईव्ह असे साहित्य जप्त करायचे आहे. गुन्हा करण्यासाठी त्यांनी आणखी काहीजणांची मदत घेतल्याचा संशय आहे. हेंगळे आणि कुमार यांच्या बरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे.

गुणवाढ देण्यात आलेले विद्यार्थी, हेंगळे, कुमार कसे संपर्कात आले. विद्यार्थ्यांनी त्यांना पैसे कसे दिले. याबाबतचा तपास करायचा असल्याने आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती ऍड. मोरे यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने हेंगळे यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे तपास करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber police arrested an assessment officer who changes marks by taking money from students