
३३ तासांत केवळ सहा वेळा ‘ब्रेक’
या शर्यतीत डॉ. धनराज हेळंबे यांनी प्रत्येकी दहा मिनिटांचे केवळ सहा ब्रेक घेतले. डॉ. हेळंबे यांनी २०१७ मध्ये पहिल्या वर्षी सांघिक गटात २४ तास ३८ मिनिटे, मागील वर्षी एकल गटात ३७ तास पाच मिनिटे, तर यंदा ३२ तास पाच मिनिटे अशी वेळ नोंदविली.
पिंपरी - इन्स्पायर इंडियातर्फे आयोजित सातव्या पुणे-गोवा ‘डेक्कन क्लिफहॅंगर’ अल्ट्रा सायकल शर्यतीमध्ये एकल गटात पिंपरी-चिंचवडचे सायकलपटू डॉ. धनराज हेळंबे यांनी ६४३ किलोमीटरचे अंतर ३२ तास पाच मिनिटांत पूर्ण केले. सुमारे सात हजार ५४० मीटर उंचीपर्यंतचे चढाईचे घाटरस्ते, पाच अवघड घाट आणि दोन घनदाट जंगल पार करीत त्यांनी हे यश मिळविले.
पुण्याजवळील भूगावपासून शर्यतीला सुरुवात झाली. कात्रज, सातारा, कोल्हापूर, निपाणी, बेळगाव, खानापूरमार्गे दांडेली, कारवार असा शर्यतीचा मार्ग राहिला. तिचा समारोप गोव्यातील बागमालो बीचवर झाला. एकल गटात ३७ स्पर्धकांनी भाग घेतला. या गटासाठी ३८ तासांत शर्यत पूर्ण करण्याचे बंधन होते. मात्र, डॉ. हेळंबे यांनी शर्यतीचे अंतर पाच तास अगोदरच पूर्ण केले.
डॉ. हेळंबे म्हणाले, ‘‘या शर्यतीचा मार्ग किमान सहा हजार मीटर उंचीवरून जातो. यंदाच्या वेळेस तो मार्ग जवळपास सात हजार ५४० मीटर उंचीवरून गेला. त्यामध्ये कात्रज, खंबाटकी, तवंडी, वंटमुरी आणि गणेशगुडी असे पाच घाट आणि बेळगावजवळील रामनगर जंगल आणि अंशी व्याघ्र प्रकल्पांचाही अंतर्भाव राहिला. पुण्यापासून सातारा रस्त्यावरील शिरवळपर्यंतचा रस्ता खराब होता. परंतु, खंबाटकीपासून निपाणीपर्यंतचा रस्ता चांगला असल्याने व्यवस्थित सायकलिंग करता आले. निपाणी ते कारवारपर्यंतच्या १७५ किलोमीटरच्या टप्प्यात रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे तेथील रस्ता खूप खराब झाला होता. दांडेलीजवळील दीडशे किलोमीटरचा खराब रस्ता आणि जाताना-येताना १६ किलोमीटरचा घाट, यामुळे सर्व सायकलपटूंची कसोटी लागली. अनेक सायकलपटूंचा वेळेचा अंदाज चुकला.
त्यांना किमान अर्धा ते दोन तास जादा खर्च करावे लागले.’’ डॉ. आदेश काळे, मयूर शानबाग, सिद्धगोंडा पाटील, विजय सानप, एन. एम. राव, नचिकेत जोशी आणि सचिन घोगरे यांचे सहकार्य लाभले.