प्लॅस्टिकमुक्तीसाठी सायकल रॅली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

बारा दिवसांत गाठले उद्दिष्ट
आम्ही सहा महिने सराव केला. त्यानंतरच मोहिमेला सुरवात केली. आम्ही रोज सकाळी ६.३० वाजता सुरवात करून साधारण नऊ तास सायकलिंग करत होतो. आम्ही १२ दिवसांत दोन हजार किलोमीटरचे अंतर गाठू शकलो. या वेळेची नोंद ‘इंडियन बुक्‍स ऑफ रेकॉर्ड’मध्ये होणार आहे, असे श्रीकांत व अरुण सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.

पुणे - प्लॅस्टिकच्या तोट्यांबाबत जनजागृती करण्यासाठी तमिळनाडूच्या श्रीकांत आणि अरुण सुब्रह्मण्यम उच्चशिक्षित भावंडांनी कन्याकुमारी ते मुंबई असा सायकल प्रवास सुरू केला. आज त्‍यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळ मोहिमेची सांगता केली.

श्रीकांत आणि अरुण हे दोघे भाऊ आहेत. त्यांनी आठ सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सायकल प्रवासाला सुरवात केली. त्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक राज्याचा प्रवास करत ते मंगळवारी महाराष्ट्रात दाखल झाले. पहिल्या टप्प्यात पुणे येथे आल्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयास भेट दिली. त्या वेळी त्यांनी ‘प्लॅस्टिकमुक्त भारत’ हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले. अरुण हा अभियंता असून, आयटी कंपनीत नोकरी करतो, तर श्रीकांत हा बी.टेकच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. आपल्याकडे प्लॅस्टिकचा अवास्तव वापर होतो आणि ते नष्ट करण्यासाठी विविध पर्याय असले, तरी ते प्रचलित नाहीत. त्यामुळेच जनजागृतीसाठी आम्ही या मोहिमेस सुरवात केली, असे अरुणने सांगितले. 

प्रवासाबाबत अरुण म्हणाला, ‘‘दोन हजार किलोमीटर सायकल  प्रवासात आम्ही विविध शाळा आणि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक कसे नष्ट करता येईल आणि त्याचा वापर कसा टाळता येईल याबाबत माहिती दिली.’’ या दोन भावांमध्ये श्रीकांत हा सायकलपटू असून, राज्यस्तरावर चांगली कामगिरी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cycle Rally for Plastic Free