सायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर केला आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, बीआरटीचे थांबे आणि मेट्रोची नियोजित स्थानके यांना सायकल ट्रॅकने जोडले जाणार आहे. त्यात तीन प्रकारचे सायकल ट्रॅक निर्माण होणार आहेत. 

पुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर केला आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, बीआरटीचे थांबे आणि मेट्रोची नियोजित स्थानके यांना सायकल ट्रॅकने जोडले जाणार आहे. त्यात तीन प्रकारचे सायकल ट्रॅक निर्माण होणार आहेत. 

एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पुण्यात 1980 पर्यंत सायकल वापरण्याचे प्रमाण 27 टक्के होते. परंतु, 2017 पर्यंत हे प्रमाण 3 टक्‍क्‍यांपर्यंत खाली घसरले. खासगी वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे सायकल वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचबरोबर सायकलस्वारांना रस्त्यावर असुरक्षित वाटत असल्यामुळे त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आयट्रान्स, सेंटर फॉर एन्व्हार्यमेंट एज्युकेशनच्या संस्कृती मेनन, आर्किटेक्‍ट अर्बन डिझायनर प्रसन्न देसाई आणि "परिसर'चे रणजित गाडगीळ यांच्या सहकार्याने पहिल्यांदाच सायकल ट्रॅक आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तो केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. 

शहरात उभारण्यात येणारे सायकल ट्रॅक सुमारे तीन मीटर रुंदीचे असतील. शहरात सायकल ट्रॅकचे जाळे निर्माण करण्यासाठी सुमारे 335 कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकारचा निधी उपलब्ध झाला नाही, तर अर्थसंकल्पात तरतूद करून दर वर्षी सुमारे 75 किलोमीटरचे सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

असे साकारणार सायकल ट्रॅक 
- स्वतंत्र सायकल ट्रॅक - 531 किलोमीटर 
- रस्त्यावर रंगवलेले ट्रॅक - 154 किलोमीटर 
- कालव्यालगतचे स्वतंत्र ट्रॅक - 74 किलोमीटर 
- दुरुस्ती करावे लागणारे ट्रॅक - 54 किलोमीटर 

सायकल ट्रॅकवर अतिक्रमणे 
शहरात या पूर्वी 180 किलोमीटरचे सायकल ट्रॅक झाले आहेत. त्यातील 92 किलोमीटरचे सायकल ट्रॅक अस्तित्वात आहेत, तर 54 किलोमीटरच्या ट्रॅकमध्ये सलगता नाही. याचबरोबर 36 किलोमीटरचे ट्रॅक नावापुरते आहेत. अस्तित्वात असलेल्या सायकल ट्रॅकवर अनेक ठिकाणी दूरध्वनीचे बॉक्‍स, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर्स, पथारीवाले, बस थांबे आदींची अतिक्रमणे असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. 

Web Title: Cycle track proposal to the Center Government