तुझा डॅडू ‘स्टार’ झाला...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पुणे - अजाणत्या वयातली स्वरा, जेमतेम चार वर्षांची... स्वराचा डॅडू तिला कायमचाच सोडून गेला आहे; पण डॅडूच असं जाणं तिला समजलेलंच नाही आणि कुणी तिला कळूही देत नाही. तरीही तिची निरागस नजर रोजच आपल्या डॅडूला शोधते आहे, त्याच्या दुचाकीचा आवाजाकडंही कान लावून बसते आहे, तो सायंकाळी तरी घरी येईल, या आशेनं. तिला गेला आठवडाभर काही केल्या डॅडू सापडत नाही. तिनं शेवटी आशाळभूत नजरेनं डॅडू इतक्‍याच प्रिय आत्तूला विचारलं, ‘डॅडू कुठे आहे?’ भावाच्या जाण्यानं आधीच कोलमडलेली आत्तू म्हणाली, ‘‘डॅडू स्टार झालाय.

पुणे - अजाणत्या वयातली स्वरा, जेमतेम चार वर्षांची... स्वराचा डॅडू तिला कायमचाच सोडून गेला आहे; पण डॅडूच असं जाणं तिला समजलेलंच नाही आणि कुणी तिला कळूही देत नाही. तरीही तिची निरागस नजर रोजच आपल्या डॅडूला शोधते आहे, त्याच्या दुचाकीचा आवाजाकडंही कान लावून बसते आहे, तो सायंकाळी तरी घरी येईल, या आशेनं. तिला गेला आठवडाभर काही केल्या डॅडू सापडत नाही. तिनं शेवटी आशाळभूत नजरेनं डॅडू इतक्‍याच प्रिय आत्तूला विचारलं, ‘डॅडू कुठे आहे?’ भावाच्या जाण्यानं आधीच कोलमडलेली आत्तू म्हणाली, ‘‘डॅडू स्टार झालाय. तो आता मुंबईला गेला आहे!’’ आत्तूच्या या समजुतीनं स्वराचा चेहरा खुलला, मात्र तिची नजर ‘त्या स्टार’च्या पावलांकडं रोखली आहे. जी पावलं आता तिच्या घराच्या अंगणात कधीच उमटणार नाहीत... 

हडपसर परिसरातल्या सामान्य कुटुंबातली स्वरा डॅडूसह आजी, मम्मी आणि आत्तूची लाडकी. केवळ चार वर्षांच्या स्वराच्या बोलण्याची ढब, राहणं आणि बागडण्यानं ती घरच्यांबरोबर शेजाऱ्यांचीही जवळची. 

स्वराच्या वडिलांचं गेल्या आठवड्यात अपघाती निधन झालं. एकुलता एक मुलगा गेल्याने आई व बहिणीसह सगळ्यांनाच धक्का बसला. ही मंडळी कशीबशी सावरतीलही; पण ‘डॅडू’ची एकुलती एक लेक म्हणजे ‘स्वरा’ला काहीही माहीत नाही. तिचा डॅडू आता कधीच घरी येणार नाही. तो सगळ्यांनाच कायमचा सोडून गेला, हे सांगण्याचं धारिष्ट्य दाखवणार तरी कोण? घरात रोज लेकीच्या वयाचाच होऊन तिच्यासोबत तितकीच धमाल करणारा डॅडू दिसेनासा झाला. त्यामुळं स्वराच बागडणं थांबलं अन्‌ रडणं वाढलं. डोळ्यांसमोर येणाऱ्या प्रत्येकाचा हात धरून ती विचारते आहे, ‘डॅडू कुठे आहे?’ या आर्त आणि निरागस प्रश्‍नाचं उत्तर कोणालाच सापडत नाही. त्यामुळं स्वराला जीव लावणारे सगळे जण कोड्यात पडले आहेत, की तिची समजूत काढायची कशी? 

डॅडूची प्रतीक्षा करणारी स्वरा आपल्या आत्तूकडं आग्रह धरत म्हणाली, ‘‘आत्तू, मला सांग ना, डॅडू कुठं गेलाय? तो येणार ना?’’ या प्रश्‍नानं भावुक झालेली आत्तू पाणावलेल्या डोळ्यांनी उत्तरली, ‘‘तुझा डॅडू स्टार झाला आहे. तो मुंबईला गेला आहे आणि तो येईल.’’ आत्तूचं हे उत्तर ऐकून स्वरा शेजारीच राहणाऱ्या मंगेशला म्हणाली, ‘‘मंगेश, माझा डॅडू स्टार झाला. तसं मलाही स्टार व्हायचंय.’’ ‘तुझा ‘स्टार’ परत येईल,’ असं जड अंतःकरणानं सांगून मंगेशनंही तिच्या भावविश्‍वाला आधार दिला.

Web Title: daddu star swara