'दगडूशेठ' करणार 10 वर्षांनी एलईडीचा वापर; यंदा 21 फूट रथ

ज्ञानेश्‍वर बिजले 
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

हजारो रंगीबेरंगी दिव्यांनी आसमंत उजळून टाकीत लक्ष्मी रस्त्यावरून दिमाखाने आणि भाविकांच्या 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषणांनी भारलेल्या वातावरणात विसर्जन मिरवणुकीचा ताबा घेणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचा यंदाचा 'श्री विकटविनायक रथ' आज मिरवणुकीसाठी सज्ज झाला आहे. 

पुणे : हजारो रंगीबेरंगी दिव्यांनी आसमंत उजळून टाकीत लक्ष्मी रस्त्यावरून दिमाखाने आणि भाविकांच्या 'गणपती बाप्पा मोरया'च्या घोषणांनी भारलेल्या वातावरणात विसर्जन मिरवणुकीचा ताबा घेणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचा यंदाचा 'श्री विकटविनायक रथ' आज मिरवणुकीसाठी सज्ज झाला आहे. 

एलईडी दिव्यांचा दहा वर्षांनी यंदा प्रथमच वापर, वेगवेगळ्या रंगांच्या विद्युतझोतांच्या उघडझापेमुळे रथावर उमटणारी बदलती आकर्षक रंगसंगती हे यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरेल. रथाचा कळसही वेगळ्या आकारात बनविला आहे. रथाच्या विद्युत रोषणाईची जबाबदारी यंदा शुभांगी वाईकर या तरूण कलाकारावर सोपविण्याची आली आहे. वाईकर कुटुंबीयांची ही तिसरी पिढी दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवाच्या विद्युतरोषणाईच्या कामात सहभागी झाली आहे. 

शुभांगी वाईकर रथाविषयी 'ई सकाळ'शी संवाद साधताना म्हणाल्या, "रथासाठी संपूर्ण भारतीय बनावटीचे एक लाख 21 हजार एलईडी दिवे वापरले. दहा वर्षांपूर्वी माझ्या भावाने एलईडीमध्ये रथासाठी विद्युतरोषणाई केली होती. त्यावेळी राज्यात एलईडी पॅनेलचा प्रथमच वापर करण्यात आला होता. रथावरील मध्यभागाची पट्टी आम्ही 'तिरंगा' रंगांची केली आहे.''

"रथासाठी आम्ही पाच रंगांचा वापर केला. प्रथम ते सर्व रंग दिसतील. त्यानंतर, चार रंग बंद होतील आणि पिवळ्या रंगांचे दिवे प्रकाशतील. त्या रथावर एलईडी फोकसद्वारे सात रंगांचे झोत टाकले जातील. त्यामुळे, रथाचा रंग बदलत जाईल आणि वेगवेगळ्या रंगांनी तो उजळून जाईल. कळसही वेगळ्या पद्धतीने बनविला आहे. त्यावरही विद्यूतझोत टाकण्यात येतील,'' अशी माहिती त्यांनी दिली. 

शुभांगी म्हणाल्या, "यंदा प्रथमच माझ्या एकटीवर संपूर्ण विद्युतरोषणाईची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचे मनावर दडपण होते. गेले महिनाभर आम्ही कलाकारांनी अविश्रांतपणे काम करीत रथाची रोषणाई पूर्ण केली. नेहमीच्या दिव्यांपेक्षा एलईडी दिव्यांच्या जोडणीचे काम अधिक कठीण असते. त्यामुळे, आम्ही सर्वांनी खूप काळजीपूर्वकपणे काम पूर्ण केले.'' 

शिल्पकार विवेक खटावकर रथाविषयी माहिती देताना म्हणाले, "सूर्याने उपासना करीत विकटविनायकाची स्थापना केली, अशी कथा आहे. वाराणसी येथे श्री विकटविनायकाचे मंदीर आहे. त्या आधारे आम्ही या रथाची संकल्पना साकारली. यंदा प्रथमच रंगीबेरंगी दिव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. कळस वेगळ्या प्रकारचा पट्ट्यांमध्ये केला आहे. सूर्यकिरणे चौफेर सप्तरंगांची उधळण करतात, तसा सूर्यकिरणाचा आभास निर्माण करणारा हा कळस आहे. मंडळाने यंदा श्री गणेशसूर्य मंदीर देखावा केला आहे. त्याचा अनुसरून हा रथ बनविण्याचा निर्णय आम्ही घेतला. रथाची उंची 21 फूट असून, लांबी व रुंदी प्रत्येकी 15 फूट आहे. रथावर आठ खांब उभारले आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dagadusheth madal will use LED after 10 years