Pune News : 'दगडूशेठ' गणपतीसमोर ३५ हजार महिलांनी केले अथर्वशीर्ष पठण; ॠषीपंचमीनिमित्त स्त्री शक्तीचा जागर, पाहा VIDEO
Summary
पुण्यातील ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण व महाआरती करून स्त्रीशक्तीचा जागर केला.
हा उपक्रम ४० व्या वर्षी पार पडला असून वातावरणात गणेश नामाचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेत महिलांचा उत्साह दिसून आला.
सोहळ्याला सुनेत्रा पवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परदेशी अभिनेत्री ऍना मारा (इटली) यांची विशेष उपस्थिती लाभली.
'दगडूशेठ' गणपतीसमोर ॠषीपंचमीनिमित्त तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. भर पाववसात पारंपरिक वेशात मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. उपक्रमाचे ४० वे वर्ष आहे.