बाणेर, बालेवाडी परिसरातील दहीहंडी उत्सवाबाबत काय झाला निर्णय; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

यावर्षी कोरोनामुळे बाणेर- बालेवाडी परिसरात दहीहंडी उत्सव रद्द करून, विविध सामाजिक कार्यामध्ये मदत केली जाणार आहे.

बालेवाडी : बाणेर, बालेवाडी परिसरात दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा  केला जातो. यासाठी चित्रपट सृष्टीतील  वेगवेगळ्या सिने कलाकारांनाही बोलवले जाते. तसेच दही हंडी फोडणाऱ्या पथकांसाठी लाखात बक्षीस ही दिली जातात. पण यावर्षी कोरोनामुळे बाणेर- बालेवाडी परिसरात दहीहंडी उत्सव रद्द करून, विविध सामाजिक कार्यामध्ये मदत केली जाणार आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माचा आनंदोत्सव साजरा केला जातो. त्याचबरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. सगळे "गोविंदा आला रे आला,  गोकुळात आनंद झाला", असे गाणे गात लहान-थोर पुरुष मंडळी या गाण्यांवर  नृत्याचा ठेका धरतात.

पुणे शहर तसेच परिसरात दहीहंडी उत्सव चौकाचौकातून साजरा केला जातो. महाराष्ट्रात शहरात, गावोगावी  उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ खेळतात. तरुणांची अनेक मंडळे एकापाठोपाठ एक दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.

पुण्या-मुंबईतील, मावळ, कोकण याठिकाणांहून  अनेक पथक दहीहंडी फोडण्यासाठी येतात. हंडी फोडणाऱ्या मंडळांना भेटवस्तू किंवा जी काही रक्कम जाहीर केली असेल ती रक्कम देऊन गौरविण्यात येते. हल्ली मुलींची पथकही या उत्सवांमध्ये हिरीरीने सहभाग घेत मनोरे रचून आपला सहभाग नोंदवतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर बाणेर-बालेवाडी येथील मंडळांनी मात्र दहीहंडी उत्सव साजरा न करता गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकाश तापकीर, अखील न्यू बाणेर मित्रमंडळ व्यापारी संघटना, साम्राज्य ग्रुप आयोजित दहीहंडी उत्सव:- यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून, या दिवशी पोलीस सहआयुक्त सुनील फुलारी यांच्या हस्ते या भागातील पोलिस स्टेशन तसेच पोलिस चौक्यांमध्ये मास्क  आणि सॅनिटायझर चे वाटप करणार आहोत. तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटपही केले जाणार आहे. 

अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन-
शहर सुधारणार  समिती अध्यक्ष, नगरसेवक अमोल बालवडकर:- यावर्षी कोरोना असल्यामुळे  लोकांनी गर्दी करु नये यासाठी दहीहंडी उत्सव रद्द करुन, त्याऐवजी 10,000 मास्कचे वाटप आमच्या फाउंडेशन'तर्फे केले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahihandi festival in Baner, Balewadi area canceled