दहीहंडी उत्सवामध्ये ९८३ मंडळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

मंडळांनी ही काळजी घ्यावी...

  • वेळेचे उल्लंघन करू नये (सकाळी सहा  ते रात्री दहा)
  • दहीहंडीची उंची वीस फुटांपेक्षा जास्त नसावी
  • गोविंदांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग नसावा
  • मर्यादेपेक्षा आवाजाची पातळी जास्त नसावी 
  • वैद्यकीय सेवा, मॅट, रुग्णवाहिका इत्यादी सुविधा आवश्‍यक

पुणे - आगामी दहीहंडी उत्सवामध्ये यंदा शहराच्या विविध भागांमधील ९८३ मंडळे सहभाग घेणार आहेत. मंडळांनी दहीहंडी उत्सव आनंदात साजरा करावा; परंतु न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू नये, अशी सूचना विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी केली. 

शहरामध्ये शनिवारी दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. मंडळांकडून या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. पुणे पोलिसांच्या परिमंडळ एक व दोनमध्ये हा उत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या धूमधडाक्‍यात साजरा केला जातो. यंदा ९८३ मंडळे या उत्सवात सहभागी होणार आहेत. त्यामध्ये लहान मंडळे ९१०, तर मोठ्या मंडळांची संख्या ७३ इतकी आहे. गेल्या वर्षी आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या चार मंडळाविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर तीन मंडळांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. या वर्षीही दहीहंडी उत्सवामध्ये आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मंडळांची संख्या घटली 
गेल्या वर्षी १००१ इतक्‍या मंडळांनी दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग घेतला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १८ मंडळांनी या उत्सवामध्ये सहभाग  घेतला नाही. या मंडळांकडून उत्सवासाठी जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dahihandi Utsav Celebration Mandal Police