नांदेड फाट्याजवळ दररोज होतेय वाहतूक कोंडी; मोठ्या अपघाताची शक्यता

निलेश बोरुडे
Monday, 21 December 2020

सध्या नांदेड फाटा ते डोणजे फाटा या दरम्यान सिंहगड रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. यापैकी नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा यादरम्यानचा टप्पा 14 मीटर रुंदीचा आहे. मध्ये दुभाजक आणि दोन्ही बाजूला प्रत्येकी सात मीटर याप्रमाणे किरकटवाडी फाट्यापर्यंत रस्त्याचे काम प्रस्तावित आहे, मात्र गोसावी वस्ती-जाधव नगर जवळ रस्त्याची रुंदी निम्म्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे.​

किरकटवाडी(पुणे) : सिंहगड रस्त्यावर ज्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द सुरू होते, तेथून काही अंतरावरच नांदेड फाटा परिसरातील जाधव नगर-गोसावी वस्तीजवळ सिंहगड रस्त्याची प्रस्तावित रुंदीपेक्षा सध्याची रुंदी जवळपास निम्म्याने कमी आहे. त्यामुळे याठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणचे अतिक्रमण काढून रस्ता रुंद न केल्यास भविष्यात  मोठा अपघात होऊ शकतो.

सध्या नांदेड फाटा ते डोणजे फाटा या दरम्यान सिंहगड रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. यापैकी नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा यादरम्यानचा टप्पा 14 मीटर रुंदीचा आहे. मध्ये दुभाजक आणि दोन्ही बाजूला प्रत्येकी सात मीटर याप्रमाणे किरकटवाडी फाट्यापर्यंत रस्त्याचे काम प्रस्तावित आहे, मात्र गोसावी वस्ती-जाधव नगर जवळ रस्त्याची रुंदी निम्म्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अरुंद रस्त्यामुळे याठिकाणी सध्या तर  वाहतूक कोंडी होत आहेच शिवाय अरुंद रस्ता व वळण असल्याने याठिकाणी मोठे अपघात होऊ शकतात. सदर ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यास स्थानिकांचा विरोध असल्याने रस्त्याच्या कामास अडथळा होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जात आहे.

भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंची गर्दी; अन् सर्वसामान्यांना फक्त 50 जणांची मर्यादा​

अनधिकृतपणे ठेवलेल्या टपऱ्यांचाही अडथळा....
सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक एकाच बाजूने सुरू आहे. त्यामुळे रस्ता अपुरा पडत आहे. त्यातच गोसावी वस्ती परिसरातील काहींनी रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे टपऱ्या ठेवलेल्या आहेत, त्या टपऱ्यांचाही वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अनधिकृत टपर्‍या काढून टाकाव्यात व  वाहतुकीस होणारा अडथळा दूर करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

"अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर सध्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. अंदाज पत्रकाप्रमाणे रस्त्याचे काम करून घेण्यात यावे. अरुंद किंवा अर्धवट रस्ता भविष्यातील अनेक अपघातांचे कारण ठरू शकतो."
- सौरभ मते, सरपंच, खडकवासला.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, निवडणुका ताकतीने लढवण्याची तयारी करा : वळसे-पाटील​

"एका बाजूने रस्ता खोदलेला आहे व दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरु आहे. रस्ता खोदलेल्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. अनेक दुचाकी व चारचाकी वाहने अंदाज न आल्याने खोदलेल्या खड्ड्यांमध्ये जात आहेत. ठेकेदाराच्या चुकीमुळे होणाऱ्या अपघातांमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचे तर नुकसान होत आहेच शिवाय नागरिकही गंभीर जखमी होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे."
-चंद्रकांत थोरे,विश्वस्त, परिवर्तन सामाजिक संस्था, नांदेड.

"गोसावी वस्ती जवळ ज्या ठिकाणी रस्ता अरुंद दिसत आहे तेथे काही  स्थानिकांचा विरोध आहे. कायदेशीर मार्गांचा अवलंब करून सदर ठिकाणी अंदाज पत्रकाप्रमाणे काम करून घेण्यात येईल. नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा या दरम्यान 14 मीटर रुंदीचा रस्ता करूनच घेण्यात येणार आहे."
-बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, निवडणुका ताकतीने लढवण्याची तयारी करा : वळसे-पाटील​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily traffic jams near Nanded Fata