वारकऱ्यांना दालखिचडी, चहा मोफत

वारकऱ्यांना दालखिचडी, चहा मोफत

आळंदी - ‘‘संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यात वारकऱ्यांसाठी शुद्ध पाणी, चहा, दालखिचडीचे मोफत वाटप केले जाणार आहे. देऊळवाड्यात वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा आणि इंद्रायणी तीरावर प्रशस्त दर्शनमंडप उभारण्याचे काम वेगात सुरू आहे,’’ अशी माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२३ वा संजीवन समाधी दिन सोहळा शुक्रवारपासून (ता. ३०) सुरू होत आहे. त्यानिमित्त कार्तिकी वारीसाठी लाखो भाविक आळंदीत येतात. वारकऱ्यांच्या दर्शनासाठी इंद्रायणीकाठी नदीपलीकडे प्रशस्त जागेत तात्पुरता दर्शनमंडप उभारण्याचे काम सुरू आहे. किमान पंधरा ते वीस हजार वारकरी एकावेळी दर्शनमंडपात एकत्र येतील, अशी सोय यात आहे. मुख्य मंदिराच्या पश्‍चिम बाजूस दोन मजली दर्शनमंडप कायमस्वरूपी असून यात चार हजार भाविकांची सोय आहे. 

मंदिरात येताना पिशव्या, चपला आणण्यास बंदी आहे. देवस्थानचे स्वतःचे सतरा सुरक्षारक्षक आणि आळंदी पोलिसांच्या वतीने बंदोबस्त दोन सत्रांत महाद्वार, पानदरवाजा, दर्शनबारी, पंखामंडप, वीणामंडप, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा या ठिकाणी राहणार आहे; तसेच महिला पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त आहे. भाविकांसाठी सवलतीच्या दरातील पन्नास रुपयांतील ज्ञानेश्वरी पारायणाच्या वीस हजार प्रती छापून तयार आहेत. दहा रुपयांत दोन याप्रमाणे लाडू प्रसादही सुमारे पंधराशे क्विंटल बनविण्याचे काम सुरू आहे. स्वच्छतेसाठी स्व-काम सेवा, विश्वसामाजिक सेवा मंडळ स्वयंसेवकांची नेमणूक तीन सत्रांत करण्यात आली आहे. माउलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी दर्शनबारीत सहा मोठे स्क्रीन लावणार आहेत. दर्शनबारीत वारकऱ्यांना मोफत खिचडी, चहा, पाणीवाटपाची सोय करण्यात येईल. वीजप्रवाह खंडित झाल्यास आपत्कालीन व्यवस्था म्हणून दोन जनरेटरची सोय केली आहे. दर्शनबारीत भाविकांसाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू केला जाणार असल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली.

ठळक मुद्दे
आजोळघर दर्शनबारी, पानदरवाजातून भाविकांना प्रवेश 
हनुमान दरवाजा, महाद्वारातून बाहेर पडण्याचा मार्ग  
गणेश दरवाजा बंद राहणार 
हरिहरेंद्रमठ स्वामी मंदिराजवळील दरवाजातून निमंत्रितांना प्रवेश  
अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, पासधारकांना हनुमान दरवाजातून प्रवेश  
सुरक्षेसाठी मंदिर व परिसरात सुमारे ९२ कॅमेरे 

दिंड्यांसाठी मोफत जागा
आळंदी देवस्थानच्या मालकीच्या चारशे पस्तीस एकर जागेत पद्मावती मंदिराच्या बाजूने दिंड्यांसाठी जागा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. अनेक दिंड्यांना मुक्कामाची अडचण असते, त्यामुळे देवस्थानने हा निर्णय घेतला आहे. त्यांना पाणी आणि वीज देण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे, असे ॲड. विकास ढगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com