पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात आले होते. चोवीस तासांत बुधवारी सकाळी लोणावळा येथे 120, कार्ला येथे 71, पवनानगर येथे 97, कामशेत येथे 64, वडगाव येथे 34, तळेगाव दाभाडे येथे 33, वडिवळे 104, शिवणे येथे 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

वडगाव मावळ : मावळ तालुक्‍यात पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही वाढविण्यात आला आहे. वडिवळे पूल वगळता इतर पुलांवरून सध्या वाहतूक सुरू आहे. मात्र पावसाचे प्रमाण वाढल्यास तालुक्‍यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
 
मावळात चार दिवसांच्या संततधारेनंतर मंगळवारी पावसाचा जोर ओसरला होता, त्यामुळे धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात आले होते. चोवीस तासांत बुधवारी सकाळी लोणावळा येथे 120, कार्ला येथे 71, पवनानगर येथे 97, कामशेत येथे 64, वडगाव येथे 34, तळेगाव दाभाडे येथे 33, वडिवळे 104, शिवणे येथे 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणातील विसर्गही त्याप्रमाणात वाढविण्यात आला. बुधवारी दिवसभरही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या. बुधवारी पवना धरणातून नऊ हजार 100 पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. वडिवळे धरणातून सकाळी दोन हजार 454 क्‍युसेक, तर सायंकाळी पाचनंतर एक हजार 256 क्‍युसेक याप्रमाणे विसर्ग सुरू होता. आंद्रा धरणातून चार हजार 34 क्‍युसेक, आंदर मावळातील ठोकळवाडी धरणातून दोन हजार 573 क्‍युसेक, तर जाधववाडी धरणातून 109 क्‍युसेक याप्रमाणे पाणी विसर्ग सुरू होता. धरणातील विसर्ग काही प्रमाणात वाढला असला तरी वडिवळे पूल वगळता इतर पुलांवरील वाहतुकीवर परिणाम झाला नाही. मात्र, विसर्ग वाढल्यास पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तालुक्‍यातील सर्व धरणे आता पूर्ण क्षमतेने भरली असल्याने पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणांतून पाणी सोडावे लागत आहे. 

गैरसोयींमध्ये वाढ 
तालुक्‍यात जवळपास गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने व झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात अनेक गैरसोयी निर्माण झाल्या आहेत. पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. अनेक घरांची व गोठ्यांची पडझड झाली आहे. भातशेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. एसटी सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने गावोगावच्या नळपाणी पुरवठा योजनांवर विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडूनही कृत्रिम टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पीठगिरण्या व इतर छोट्या व्यवसायांवरही परिणाम झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dam water will realese