संकटकाळी मदतीसाठी धावतेय 'दामिनी'

Pune Police
Pune Police

पुणे : कौटुंबिक वादास कंटाळून एक महिला येरवड्यात नदीमध्ये जीव देण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाद्वारे येरवडा दामिनी पथकास मिळाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच दामिनी महिला बीट मार्शल येरवड्यातील चिमाघाटावर पोचल्या. त्या महिलेने पाण्यात उडी मारली, त्याचक्षणी दोन्ही दामिनी बीट मार्शल पुढे सरसावल्या आणि त्यांनी महिलेचे प्राण वाचविले. पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला बीट मार्शल अशाप्रकारे अल्पवयीन मुली, तरुणी, महिलांबरोबरच लहान मुले, वृद्धांना संकटाच्या वेळी धावून जात आहेत. 

पोलिसांच्या 'भरोसा सेल'अंतर्गत येणाऱ्या महिला सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून शहरामध्ये काही वर्षांपासून दामिनी पथक सुरू आहे. अल्पवयीन मुली, महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिलांना कोणत्याही प्रकारचा धोका वाटल्यास त्यांच्या मदतीसाठी तत्काळ धावून जाण्याची जबाबदारी दामिनी पथकाच्या खांद्यावर सोपविण्यात आली. मागील वर्षीपर्यंत दामिनी पथकाची कामगिरी समाधानकारक नव्हती. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी या पथकात नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांना स्थान देऊन दामिनी पथकाला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दामिनी पथकाच्या कामाचा आलेख उंचावला आहे. 

असे चालते दामिनी पथकाचे काम ! 
पोलिस नियंत्रण कक्ष किंवा 1091 या महिलांसाठीच्या हेल्पलाइन क्रमांकावरून दामिनी पथकास महिला, वृद्ध किंवा लहान मुलांबाबत घडणाऱ्या एखाद्या घटनेची माहिती मिळते. दामिनी पथक माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच घटनास्थळी पोचते. त्यानंतर संबंधित महिला, तरुणीची सुटका करून आरोपींना नजीकच्या पोलिस ठाण्यात नेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करते. 

दामिनी पथकाची वैशिष्ट्ये 
* शहरात 31 महिला बीट मार्शल 
* सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत मदत 
* दोन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दामिनी पथकाची गस्त 
* खबर मिळाल्यानंतर काही मिनिटांत घटनास्थळी 
* शाळा, महाविद्यालये, कंपन्या, कार्यालयांभोवती गस्त 
* शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थिनी, तरुणींशी संवाद 

दामिनी बीट मार्शल शाळा, महाविद्यालये सुटण्यावेळी तेथे गस्त घालतात. याबरोबरच गर्दीच्या ठिकाणीही पथकाचे काम सुरू असते. विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याबरोबरच त्यांच्यात जनजागृती करण्यासही प्राधान्य देत आहोत. 
- विजया कारंडे, पोलिस निरीक्षक, भरोसा सेल 

तरुणी, महिलांना कोणत्याही प्रकारचा धोका जाणवल्यास त्या पोलिस नियंत्रण कक्ष, महिला हेल्पलाईनद्वारे मिळणाऱ्या माहितीवरून तत्काळ प्रतिसाद दिला जातो. अनेकदा सापळा रचून आरोपींना अटक केली जाते. 
- प्रतिभा जाधव, दामिनी बीट मार्शल

इथे करा संपर्क :
महिला हेल्पलाइन - 1091

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com