कोरोनामुक्त इंदापुरात हा धोका...अशी घेणार काळजी...

डाॅ. संदेश शहा
Saturday, 16 May 2020

इंदापूर शहर व तालुक्‍यात एकही कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे अनेक नातेवाईक इंदापूरला येत आहेत. मात्र, त्यांच्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका आहे.

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहर व तालुक्‍यात एकही कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे अनेक नातेवाईक इंदापूरला येत आहेत. मात्र, त्यांच्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका आहे. तो रोखण्यासाठी तालुक्‍यात येणाऱ्यांचे विलगीकरण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी लेखी आदेश काढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले. 

अवघडच आहे, दौंडमध्ये कोरोनाबाधिताच्या मुलाकडून चहाची विक्री... 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत भरणे बोलत होते. या वेळी त्यांनी आजपर्यंत कोरोना संचारबंदीत चांगले योगदान दिल्याबद्दल सर्व अधिकारी, डॉक्‍टर, पोलिस व महसूल कर्मचारी, शिक्षक, आशा स्वयंसेविका, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल व त्यांच्या कामास सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व इंदापूरकरांचे कौतुक करून आभार मानले. 

कोरोनाच्या लढाईसाठी बारामती आणखी सज्ज...या आहेत सुविधा  

भरणे म्हणाले, ""कोरोना संक्रमणाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा सुरू असून, गावपातळीवर तलाठी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, कोतवाल यांनी सजग राहणे गरजेचे आहे. गावात बाहेरून माणूस आल्यास त्यांनी प्रशासनात कळविल्यास त्याची योग्य काळजी घेतली जाईल. प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांची देखील योग्य काळजी घ्यावी.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या वेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश मोरे, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पुढेवर व जीवन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तालुका अभियंता धनंजय वैद्य, वीज मंडळाचे तालुका अभियंता रघुनाथ गोफणे, नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी आपला आढावा सादर केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रतापराव पाटील, दत्तात्रेय घोगरे, पत्रकार नीलकंठ मोहिते यांनी विविध सूचना मांडल्या. 

दरम्यान, इंदापूर तालुक्‍यात उपजिल्हा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय वसतिगृह व भिगवण ट्रॉमा सेंटर येथे संशयित कोरोना रुग्णांच्या घशातील द्रव तपासणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे निदान करणे सोपे जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the danger in Corona-free Indapur taluka