भीती ‘माळीण’च्या पुनरावृत्तीची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

टाकवे बुद्रुक - पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आंदर मावळात मोरमारवाडी, डोंगरवाडी, सटवाईवाडी, हेमाडेवस्ती या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे डोंगर पठारावरील नागरिकांची दळणवळणाची सोय होण्यास मदत होणार आहे. तथापि, पावसामध्ये या रस्त्याच्या कामाला अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या ठिकाणी खोदलेल्या मातीच्या गटारामध्ये डोंगरावरील पाणी झिरपून माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 

लाखो रुपयांचा हा प्रकल्प आहे. आधुनिक यंत्राच्या मदतीने रस्त्याचे काम करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यात वळणवळणाचा हा रस्ता फोडून त्यावर मुरूम मातीचा भराव टाकला आहे. आता त्यावर खडी पसरून डांबरीकरण करण्याची तयारी सुरू आहे. तथापि, पावसाळा सुरू झाल्याने रस्त्याच्या पुढील विकासाला ब्रेक लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. येथे संततधार पाऊस असतो. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे धबधबे वाहू लागतील. डोंगराच्या कुशीतून पावसाचे पाणी वाहण्यास सुरवात होईल.

परिणामी, रस्त्याच्या कामाअंतर्गत खोदलेल्या मातीच्या गटारातून पावसाचे पाणी वाहू लागेल. या गटारातून पाणी डोंगराच्या भूभागात झिरपत राहिल्यास, तसेच माती निखळू लागल्यास मोरमारवाडी गावात माळीणच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती गावकरी व्यक्त करीत आहे. सध्या मोरमारवाडीकर जीव मुठीत धरून रात्र काढीत आहे. 

दिलीप जगताप व अशोक जगताप म्हणाले, आम्ही दोघे भाऊ येथे राहतो, घरात अकरा माणसे आहेत. मागील वर्षी मुसळधार पावसात रात्री दरड कोसळली. जिवात जीव राहिला नाही. याही वर्षी भीतीचे सावट कायम आहे. 

वडेश्वर, गभालेवाडी, मोरमारेवाडी, माऊ ही सर्व गावे वडेश्वर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. मोरमारेवाडीतून डोंगरवाडीला जोडणारा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्ता जातो. रस्त्याच्या उत्खननात मुरूम, माती, दगड निघाले आहेत. ते पावसाळ्यात मोठ्या ओढयाने मुख्य रस्त्यावर किंवा मोरमारेवाडीत येऊ शकतात. त्यामुळे येथील नागरिक चिंतित आहे. सरकारने या गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही. 
-  गुलाब गभाले, सरपंच, वडेश्‍वर

Web Title: danger malin repetition