पर्णकुटी टेकडीलगतचे धोकादायक घर पाडले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

येरवडा - लक्ष्मीनगर येथील पर्णकुटी टेकडीलगत धोकादायकपणे बांधलेले सिमेंट कॉंक्रिटचे (स्लॅब) घर येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने नुकतेच पाडले. दरडीच्या खाली हे घर बांधले होते. पावसाळ्यात घरावर दरड कोसळून जीवितहानी होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे घर पाडल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त विजय लांडगे यांनी दिली. दरम्यान, टेकडी संरक्षित करण्यासाठीचा निधी वर्ग केल्याची माहिती समोर आली आहे. 

लक्ष्मीनगर येथे पर्णकुटी टेकडीलगत अनेकजण धोकादायकपणे राहत आहेत. गेल्या वर्षी दरड कोसळून येथील घरांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र सुदैवाने घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नव्हती. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नुकत्याच केलेल्या पाहणीत टेकडीलगत एका रहिवाशाने सिमेंट कॉंक्रिटचे घर बांधल्याचे आढळून आले होते. शेजारी मोठी दरड असल्यामुळे पावसाळ्यात या घराला धोका होता. त्यामुळे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने कारवाई करून हे घर पाडल्याचे लांडगे यांनी सांगितले. 

या टेकडीच्या भोवती अनेकजण धोकादायकपणे राहत आहेत. टेकडीलगत अनेक रस्ते असल्यामुळे दरड कोसळून जीवितहानी होऊ शकते. टेकडीला घाट रस्त्याप्रमाणे सिमेंट कॉंक्रीट व तारेच्या जाळीने संरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र महापालिका दरवेळी निधीचे कारण सांगून हे काम टाळत आहे. तर दुसऱ्या बाजूला गरज नसताना कोट्यवधी रुपये विकासकामांवर खर्च केला जात असल्याचा विरोधाभास या ठिकाणी दिसून येत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. 

पुणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनीही टेकडी संरक्षित करण्यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली होती. मात्र हा निधी वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे हे काम होऊ शकले नाही. 
- रामभाऊ बंडगर, रहिवाशी, लक्ष्मीनगर 

Web Title: Dangerous house demolished near Parnakuti tekadi