वारकऱ्यांचा धोकादायक प्रवास

सचिन लोंढे
मंगळवार, 24 जुलै 2018

पायी वारी केलेल्या वारकऱ्यांचा परतीचा प्रवास धोकादायक पध्दतीने सुरू आहे. कोणी वाहनाच्या छतावर तर कोणी टँकरच्या टाकीवर बसून प्रवास करत असल्याचे सर्रास चित्र महामार्गावर पाहावयास मिळत आहे.

कळस - एकादशीला पंढरीच्या विठ्ठल चरणी माथा टेकून आषाढी वारी पूर्ण केलेल्या वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीत वाढ झाली आहे. परंतू पायी वारी केलेल्या वारकऱ्यांचा परतीचा प्रवास धोकादायक पध्दतीने सुरू आहे. कोणी वाहनाच्या छतावर तर कोणी टँकरच्या टाकीवर बसून प्रवास करत असल्याचे सर्रास चित्र महामार्गावर पाहावयास मिळत आहे. छतावर बसलेले हे प्रवाशी डुलक्या घेत असल्याचेही निर्दशनास आल्याने, या वारकऱ्यांना छताएेवजी वाहनात बसून प्रवास करण्याच्या सूचना पोलिसांनी देणे गरजेचे आहे. 

गेल्या काही दिवसांपासून दिंडीतून पायी वारी करत पंढरपूर गाठलेल्या वारकऱ्यांना अर्थातच घराची ओढ लागली आहे. अनेक दिंड्या, पालखी रथ सध्या परतीचा प्रवास करत आहेत. यामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील वाहतूक वाढली आहे. लहान मोठे ट्रक, टेंपो, ट्रॅक्टर-ट्राॅली यांसारख्या वाहनांबरोबरच प्रवासी वाहतूक वाहनांतून वारकरी प्रवास करत आहेत. मात्र अनेकजण वाहनांच्या छतावर बसून प्रवास करत आहेत. मात्र पोलिसांकडून याबाबत काहीच कार्यवाही झाल्याचे आढळून आले नाही. दरम्यान महामार्ग पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर महाराष्ट्र बंद असल्याने पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर गेल्याचे सांगण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता. 

 

Web Title: Dangerous Journey of Warkaris