रेटवडीकरांचा धोकादायक प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

दावडी - रेटवडी (ता. खेड) येथील दशक्रिया घाट ते सतारकावस्ती रस्त्याला लागून असलेल्या ओढ्याची संरक्षक भिंत तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसात कोसळल्यामुळे रस्ताही वाहून गेला. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना पर्यायी रस्त्याने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

दावडी - रेटवडी (ता. खेड) येथील दशक्रिया घाट ते सतारकावस्ती रस्त्याला लागून असलेल्या ओढ्याची संरक्षक भिंत तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसात कोसळल्यामुळे रस्ताही वाहून गेला. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना पर्यायी रस्त्याने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

रेटवडी येथील दशक्रिया घाट ते सतारकावस्ती या दोन किलोमीटरच्या रस्त्याशेजारून मोठा ओढा वाहत असून, या ओढ्याला सुमारे तीनशे फूट संरक्षक भिंत आहे. या संरक्षक भिंतीमुळे ओढ्याला दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरापासून रस्त्याचे संरक्षण होत होते. मात्र, मागील वर्षी ओढ्याला आलेल्या पुरामुळे संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसाच्या पुरामुळे संरक्षक भिंतीचा बराचसा भाग कोसळला आहे. 

रस्त्याचा बराचसा भराव वाहून गेला आहे. या रस्त्यावरून मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वाबळदरा, सतारकावस्ती, नेमणदरा, बंगलावस्ती व दोन ठाकरवाड्या येथील ग्रामस्थांना शेतीमाल व इतर वाहतूक करण्यासाठी आणि सतारकावस्ती शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या आठ बसना चासकमान कालव्याच्या भरावावर असलेल्या लांबच्या खराब रस्त्यावरून नाईलाजाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

या कालव्याच्या भरावावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचून हे खड्डे अधिकच धोकादायक झाले आहेत. तसेच, मातीचा भराव असल्याने रस्ता निसरडा झालेला आहे. 

कालव्यास आवर्तन सुरू असल्यामुळे कालवा पूर्ण क्षमतेने वाहत आहे. या रस्त्यावरून सतारकावस्ती शाळेच्या आठ बस दररोज मुलांची वाहतूक करीत असतात. 

या रस्त्यावर सध्या पावसाळा असल्याने यदाकदाचित दुर्घटना घडलीच तर मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे दशक्रिया घाट ते सतारकावस्ती रस्त्याच्या संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम त्वरित करावे, तसेच या रस्त्यावरील ओढ्यावर असलेल्या पुलाऐवजी साकव पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुभाष हिंगे व सामाजिक कार्यकर्ते शंकर काळे यांनी केली आहे.

Web Title: Dangerous Travel in khed