होय होय वारकरी...वारकऱ्यांकडून विवेकाचे दर्शन 

विलास काटे
शनिवार, 30 मे 2020

शासनाने वारीवर आपत्कालीन परिस्थिती पाहून वारकऱ्यांना विचारात घेत निर्बंध घातले. त्याला साथ देत वारकऱ्यांनी विवेकाचेच दर्शन घडविले. 

आळंदी (पुणे) : आषाढी पायी वारी सोहळ्याऐवजी संतांच्या पालख्यांच्या पादुकांचे आपापल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीच प्रस्थान करावे. मात्र, पायी वारी निघणार नाही. नंतर थेट आषाढ शुद्ध दशमीलाच पालखी सोहळा हेलिकॉप्टर ,बस अथवा पर्याप्त सोयीद्वारे मोजक्‍याच वारकरी प्रतिनिधींसह संतांच्या पादुका पंढरपूरला पोचणार आहे. सरकारचा हा निर्णय वारकऱ्यांनी सहृदय स्वीकारला. यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवलेली दक्षता आणि वारकऱ्यांच्या विवेकाचे दर्शन घडले. 

कोरोनाचा फटका थेट पायी वारीला झाला आहे. सरकारने पायी वारीस बंदी घातली आहे. मात्र, अनेक वारकऱ्यांनी शासनाच्या निर्णय होण्याआधीच स्वतःच्या मनाची तयारी केली होती की, आपल्याला यंदा पायी वारीत सहभागी होता येणार नाही. कोरोनाचे गांभीर्य आणि भान वारकऱ्यांमध्ये होते. त्यामुळे वारकरी आणि संबंधित देवस्थानांनी सुरवातीपासूनचवारीचा निर्णय सर्वस्वी शासनावर अवलंबून ठेवला होता. त्यादृष्टीने सरकारपुढे पायी वारी जाण्याबाबत विविध पर्याय मानाच्या प्रमुख सहा पालख्यांमधील वारकरी आणि देवस्थानांनी ठेवले होते. मात्र, कोरोनाचा तिसरा लॉकडाउन संपून चौथा टप्पाही संपत आला तरी वारकरी संभ्रमात होते. 

परिणामी संत निवृत्तिनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत एकनाथ या प्रमुख चार पालख्यांनी जाग्यावरच प्रस्थान सोहळा पार पाडून पालखी आपापल्या गावात ठेवण्याचा आणि थेट दशमीच्या दिवशी पंढरीत पोचायचा निर्णय घेतला. उरले देहू आणि आळंदी हे दोन्ही देवस्थान मोठे आणि पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने वारकऱ्यांबरोबरच देवस्थान आणि शासनापुढे मोठा पेच होता. मात्र, या दोन्ही पालख्या ज्या पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून जातात, त्याठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक झाला. खुद्द पंढरपुरात कोरोनाचे रुग्ण आहे. मुंबईतही कोरोनाने कहर केला. यामुळे शासनाने पालखी सोहळ्यावर बंधने घातली. निर्णयाने काही प्रतिष्ठित वारकरी दुखावले. मात्र, बहुसंख्य वारकऱ्यांनी मोठ्या मनाने शासनाचा निर्णय स्वीकारला. 

शासनापुढे कोरोनाचे संकट आ वासून होते. पालखी सोहळ्याबाबतच्या घडामोडींवर आणि होणाऱ्या चर्चांवर शासनाचे प्रतिनिधी लक्ष देवून होते. ऐनवेळी गडबड होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यासही शासन दक्ष असल्याचे चित्र आहे. पायी वारीबाबत सुरवातीपासून अनिश्‍चितता होती. निर्णयामुळे यंदाच्यावर्षी पायी सोहळा होणार नाही. थोडीशी खंत निश्‍चित आहे. मात्र, परंपरेबरोबरच समाजहितही महत्त्वाचे मानून वारकऱ्यांनी शासनाबरोबर असल्याचे सांगत आहे. सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने सरकारच्या या तात्कालिक निर्णयास अनुसरून सर्वांनी पायी वारीबाबत सहमतीची भूमिका घेतली. अखेर अडचणींवर मात करणारा तोच खरा वारकरी, हे वारकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून दाखवले. 

वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी माउलींच्या पादुका गाडीद्वारे थेट पंढरपुरात जाऊन वारी पूर्ण करणे; तर देहू देवस्थाननेही मोजक्‍या वारकऱ्यांसोबत आम्हाला जाऊ द्या, अशी मागणी केली होती. वारकऱ्यांच्या रीमधे री ओढत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पायी वारीबाबत विधाने केली. मात्र, वस्तुस्थितीचा विचार करून शासनाने यावर गंभीर विचार केला आणि पायी वारीबाबत बंदीचा निर्णय घेतला. मात्र, सरकारच्या या निर्णयाच्या निर्बंधामुळे 

जाता पंढरीसी सुख वाटे जिवा 
आनंदे केशवा भेटताची, 
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी... 

अशा या परमसुखाला वारकरी पायी वारी नसल्याने मुकले. 

सोहळ्यातील वैभव अनुभवता येणार नाही... 
आळंदीतील माउलींचा नयनरम्य पालखी प्रस्थान सोहळ्याबरोबरच सोहळ्यातील चांदीचे रथ आणि त्यामध्ये ठेवलेल्या संतांच्या पादुका, ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांचे मानाचे अश्व, अश्वांनी घेतलेले उभ्या आणि गोल रिंगणातील नेत्रदीपक धाव, नीरा स्नान, समाज आरती, कीर्तन, जागर, पहाटेची पवमान पूजा, पालखी तळावरील दिंडी समाज संघटनेची बैठक, जागोजागी केले जाणारे अन्नदान, स्वागत, गावागावातील उत्साही तरुणाई आणि माहेरवासिनींचा दर्शनासाठीची झुंबड, गावाला आलेले जत्रेचे स्वरूप, आणि सोबत वाखरी ते पंढरपूर या वाटचालीतील लाखोंच्या संख्येने जमलेला वारकऱ्यांचा मेळा यंदाच्या वर्षी दिसणार नाही. 
एकंदर यंदाच्या वाटचालीत अल्प वारक-यांना संधी असल्याने वैभव याची डोळा याची देही अनुभवण्यास मिळणार नाही. आज देशातच नाही तर जगभरात कोरोनाने थैमान घातले. हजारो लोक मृत्यू पावले. लाखो लोक उपचार घेत आहेत. संसर्गाने होणारा आजार असल्याने शासन दक्षता घेत आहे. यंदा चैत्री वारीवर बंदी घातली. मात्र सध्याची परिस्थितीनुसार लाखोंचा, हजारोंचाच काय पण शंभर लोक एकत्र आले तरी त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागणार आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यात पोलिस आणि आरोग्य विभागावर प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण आहे. त्यातच पायी वारी सोहळ्याचे नियोजन करायचे झाल्यास सगळी यंत्रणाच विस्कळित होईल. पुढचे संकट लक्षात घेता शासनाने वारीवर आपत्कालीन परिस्थिती पाहून वारकऱ्यांना विचारात घेत निर्बंध घातले. त्याला साथ देत वारकऱ्यांनी विवेकाचेच दर्शन घडविले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darshan of Viveka from Warakaris in the decision regarding Wari