सर्वसाधारण सभेत सानेंनी आणली कुत्र्याची पिले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

पिंपरी - शहरातील नागरिकांना भटकी कुत्री व डुकरांचा उपद्रव होत असल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी कुत्र्याची पिले बॅगेतून महापालिका भवनात आणली. त्यामुळे साने यांच्यावर पेटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेविका सीमा सावळे यांनी सर्वसाधारण सभेत केली. त्यावर चर्चा सुरू असताना साने आणि सावळे यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावरून झालेला गोंधळ वाढला आणि सत्ताधारी भाजप व विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर धावले. पुन्हा गोंधळ वाढल्याने 27 सप्टेंबरपर्यंत महापौरांनी सभा तहकूब केली. 

शहरातील भटकी कुत्री व डुकरांच्या उपद्रवावर मंगळवारी (ता. 18) महापालिका स्थायी समिती सभेत चर्चा झाली होती. या उपद्रवाला सत्ताधारी भाजप व अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप करीत विरोधी पक्ष नेते साने बुधवारी (ता. 19) सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी कुत्र्याची पिले बॅगेत घेऊन आले होते. हे लक्षात आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक शहरातील भटक्‍या कुत्र्यांवरून चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी आणि भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी साने यांची समजूत काढल्यानंतर ती सोडून दिली. त्यानंतर सर्वसाधारण सभा सुरू झाली. सुरवातीलाच सावळे यांनी पेटा कायद्यानुसार (पशूंबाबत अनैतिक व्यवहार प्रतिबंधक कायदा) साने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यासह शहरातील मोकाट जनावरे, भटकी कुत्री व डुकरांच्या उपद्रवाबाबत सभागृहात चर्चा सुरू झाली. महापौरांनी साने यांनी बोलण्यास संधी दिली. साने यांचे बोलणे खंडित करीत सावळे मध्येच बोलल्या. त्यावरून साने चिडले आणि "तुम्ही मध्ये बोलायचे नाही', असे म्हणाले. त्यावरून दोघांत शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यात साने यांनी "मी 96 कुळी शेतकरी आहे', असे सावळे यांच्याकडे बघून म्हटले आणि सावळे आणखीच आक्रमक झाल्या. त्यामुळे पुन्हा गोंधळ वाढला. सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नगरसेवक पीठासनासमोर जमा झाले. या गोंधळात महापौरांनी एकनाथ पवार यांना बोलण्यास सांगितले. त्यांनी, "सत्ता गेल्यानंतर एखादा पक्ष किती व्यथित होता, याची प्रचिती आली,' असा शब्द प्रयोग केला आणि गोंधळात आणखीच भर पडली. कुणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे पाहून सभा दहा मिनिटे तहकूब करण्यात आली. ती पुन्हा सुरू झाल्यानंतर पवार यांनी "96 कुळी' शब्द वगळून सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. महापौरांनी सुचविल्यानंतर नामदेव ढाके यांनी शहरातील मृत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचा विषय मांडला. श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभा 27 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Datta sane brought the Puppies in the PCMC general meeting