पवारांच्या गाडीत भरणे-पाटील एकत्र! (व्हिडिओ)

पवारांच्या गाडीत भरणे-पाटील एकत्र! (व्हिडिओ)

वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित प्रवास केला.

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक होते. भरणे व पाटील हे दोघेही एकमेकांना पाण्यात पाहत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील व पवार कुटुंबीयांचे मनोमीलन झाल्याने दोन्ही पक्ष एकत्र आले.

एकमेकांवर टीकेची झोड उडविणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येत इंदापूर तालुक्‍यात खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचाराची धुरा सांभाळली. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात जाणवला. दोन्ही पक्षाने एकदिलाने काम केल्याने तालुक्‍यातून सुळे यांनी 70 हजार 938 मताधिक्‍य घेऊन मोदी लाटेतही सहज विजय मिळविला. 
निकालानंतर शरद पवार यांनी राज्यात दुष्काळी दौऱ्यास सुरवात केली. ते आज इंदापूर तालुक्‍यात आले होते.

दौऱ्यात हर्षवर्धन पाटील यांनाही आवर्जून सहभागी होण्यास सांगितले होते. याशिवाय आमदार भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, माजी सभापती मयूर पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कॉंग्रेसचे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव यांच्यासह दोन्ही कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

उमेदवारीबाबत पवारांचा शब्द अंतिम 

येत्या चार महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे.

इंदापूर तालुक्‍यात दत्तात्रेय भरणे हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत, तर कॉंग्रेसचे हर्षवर्धन पाटील हेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. आजच्या दौऱ्यात पाटील हे पवारांच्या शेजारील आसनावर, तर भरणे हे पुढील आसनावर बसले होते. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत शरद पवार यांचा शब्द अंतिम व महत्त्वाचा असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com