गेली आठ महिने आईपासून दुरावलेली चिमुकली आता तिच्यासोबत करणार दिवाळी साजरी

सनील गाडेकर 
Thursday, 12 November 2020

घटस्फोटाचा दावा सुरू असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून पाच वर्षांच्या मुलीची भेट न झालेल्या आईला मुलीच्या सहवासाचे गिफ्ट मिळाले आहे. 13 ते 15 नोव्हेंबर असे दोन दिवस मुलीच्या वडिलांनी तिचा ताबा आईला द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित आईची दिवाळी यंदा घरच्या लक्ष्मीसोबत साजरी होणार आहे.

पुणे : घटस्फोटाचा दावा सुरू असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून पाच वर्षांच्या मुलीची भेट न झालेल्या आईला मुलीच्या सहवासाचे गिफ्ट मिळाले आहे. 13 ते 15 नोव्हेंबर असे दोन दिवस मुलीच्या वडिलांनी तिचा ताबा आईला द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित आईची दिवाळी यंदा घरच्या लक्ष्मीसोबत साजरी होणार आहे.

हे ही वाचा : शिक्षणाला मनोरंजनाची साथ हवी : डॉ. भूषण पटवर्धन

केतकी आणि मानस यांच्या घटस्फोटाचे प्रकरण येथील कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. मानस यांनी घटस्फोटासाठी दावा दाखल केला आहे. दोघेही जुलै 2019 पासून वेगळे राहत आहेत. त्यांना आरोही (सर्व नावे बदललेली) नावाची पाच वर्षांची मुलगी असून तिचा ताबा मानस यांच्याकडे दिला आहे. केतकी यांना कोरोनामुळे गेले आठ महिने मुलीला भेटता आलेले नाही. त्यामुळे किमान दिवाळी तरी मुलीसोबत साजरी करता यावी, यासाठी तिचा ताबा मिळावा म्हणून ऍड. भूषण कुलकर्णी यांच्यामार्फत अर्ज केला होता. त्यावर कोरोनाचे कारण पुढे करीत केतकी यांची मागणी फेटाळण्याची मागणी मानस यांनी केली होती.

हे ही वाचा : जाणून घ्या, पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थिती

न्यायाधीश गिरीश भालचंद्र यांनी दोघांना समुपदेशकाकडे पाठविले. मात्र समुपदेशनादरम्यान मानस यांनी मुलीला केतकी यांच्याकडे न देण्याचा पवित्रा घेतल्याने समुपदेशन होऊ शकले नाही. त्यानंतर मुलीच्या हिताचा विचार करून तिच्या वडिलांनी तिला दोन दिवस आईकडे आणून सोडण्याचा आदेश दिला. आरोही सध्या वशिंड येथे वडिलांसोबत राहत आहे. मानस यांनी तिला उद्या (ता. 13) सकाळी साडेदहा वाजता पुण्यात राहत असलेल्या तिच्या आईच्या घरी सोडावे. तसेच केतकी यांनी मुलीचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी योग्य ती सर्व खबरदारी घ्यावी, असे आदेशात नमूद आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The daughter who has been separated from her mother for the past eight months is going to celebrate Diwali with her mother