esakal | दौंड : उप अधीक्षकांना बदलीची धमकी देणार्यास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दौंड : उप अधीक्षकांना बदलीची धमकी देणार्यास अटक

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंडचे पोलिस उप अधीक्षक यांना पंधरा दिवसांत बदली करण्याची धमकी आणि दौंडचे पोलिस निरीक्षकांना अरेरावी करणारा तोतया निवृत्त मेजर संदीप लगड आणि महिला वकील अॅड. रेश्मा चौधरी यांच्याविरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्करातील निवृत्त मेजर असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी त्रिदल सैनिक संघाचा अध्यक्ष संदीप लगड यास अटक करण्यात आली आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी या बाबत माहिती दिली. दौंड शहरातील पोलिस उप अधीक्षक कार्यालयात ११ सप्टेंबर रोजी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी उप अधीक्षक राहुल धस यांच्याकडे तोतया निवृत्त मेजर संदीप वामन लगड (रा. बोरीबेल, ता. दौंड) व अॅड. रेश्मा चौधरी (रा. पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे) हे आले होते. नियमानुसार गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे राहुल धस यांनी स्पष्ट करताच संदीप लगड याने त्यांना ` तुम्ही दौंड मध्ये काम कसं करता ते बघतो, १५ दिवसांत बदली करतो'' अशी धमकी दिली. त्या वेळी उपस्थित असणारे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दोघांना जबाबदारीने बोलण्याचे सुचविले असता त्यांनी त्यांनाही अरेरावी केली.

हेही वाचा: आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ. नितीन करमळकर

पोलिस उप अधीक्षक कार्यालयातील महिला हवालदार छाया जगताप यांनी अॅड. रेश्मा चौधरी यांना कक्षाच्या बाहेर जाऊन मोबाइल कॅाल करण्यास सांगितले असता अॅड. चौधरी यांनी त्यांचा हात झटकून `तुझ्याकडे पण बघून घेते `, अशी धमकी दिली. या प्रकरणी छाया जगताप यांच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात संदीप लगड व रेश्मा चौधरी यांच्याविरूध्द शासकीय कामात अडथळा आणणे, लोकसेवकास दुखापत पोचविणे, धाकदपटशा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्या एका प्रकरणात संदीप वामन लगड याच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लगड हा नाशिक येथे लष्कराच्या एका तुकडीत असताना पळून आल्याने त्यास सेवेतून काढून टाकण्यात आले होते. तरी देखील तो स्वतःला निवृत्त मेजर म्हणवून घेत मिरवत होता आणि त्याने त्रिदल सैनिक सेवा संघ नावाची संस्था काढून त्याद्वारे लोकांची दिशाभूल करत होता. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची संस्थेत नोंदणी करून तो स्वतःच्या फायद्याकरिता पैशांची देवाणघेवाण करीत होता. शासनाचे सैनिक कल्याण विभाग आणि माजी सैनिक कल्याण मंत्री यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून चर्चा करण्यासह अडचणी सोडवित असल्याचा आव तो आणून फसवणूक करीत होता.

हेही वाचा: बुलडाणा : बापाचा खून करणाऱ्या मुलीस न्यायालयीन कोठडी

खासगी वाहनावर भारतीय लष्कराच्या बोधचिन्हाचा वापर करण्यासह लष्कराची बोधचिन्हे असलेल्या कॅप तो बाळगत होता. या बाबत सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल चंद्रशेखर जनार्दन रानडे (रा. नवी मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप वामन लगड याच्याविरूध्द दौंड पोलिस ठाण्यात फसवणूक करणे आणि तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top