प्लॅनप्रमाणे दरोडा टाकला खरा पण... 

प्रफुल्ल भंडारी
Tuesday, 15 September 2020

पुणे - सोलापूर महामार्गावर ट्रकचालकाकडील २९ लाख रूपयांची रोकड लुटण्यासाठी टोळीच्या म्होरक्याने एकमेकांचा परिचय नसलेल्या दोन तालुक्यातील तरूणांची निवड करीत लूट केली. परंतु दौंड व यवत पोलिसांची तत्परता आणि दौंड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शिताफीने तपास करीत टोळीतील एकूण पाच आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून १८ लाख ७४ हजारांची रोकड व तीन दुचाकी गाड्या हस्तगत केल्या आहेत. 

दौंड ( पुणे) : पुणे - सोलापूर महामार्गावर ट्रकचालकाकडील २९ लाख रूपयांची रोकड लुटण्यासाठी टोळीच्या म्होरक्याने एकमेकांचा परिचय नसलेल्या दोन तालुक्यातील तरूणांची निवड करीत लूट केली. परंतु दौंड व यवत पोलिसांची तत्परता आणि दौंड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शिताफीने तपास करीत टोळीतील एकूण पाच आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून १८ लाख ७४ हजारांची रोकड व तीन दुचाकी गाड्या हस्तगत केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी या बाबत माहिती दिली. दरोड्याचा सूत्रधार मंगेश चव्हाण (रा. चौफुला, ता. दौंड) याने दरोड्याकरिता दौंड व बारामती तालुक्यातील तरूणांची निवड केली. हे तरूण दरोड्याच्या दिवशी एकत्र आले तरी परस्परांना ओळखत नव्हते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आणि तपासाच्या दिशा भरकटविण्यासाठी विना क्रमांकाच्या एकाच काळ्या रंगाच्या दुचाकी गाड्या वापरून दरोड्यानंतर कोणी कोठे व कसे पसार व्हायचे, याचा प्लॅन करण्यात आला. त्यानुसार २९ ऑगस्ट रोजी पुणे - सोलापूर महामार्गावर मळद (ता. दौंड) येथे दोन दुचाकीवरील पाच तरूणांनी सागर महाजन (रा. लोणी काळभोर) या ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्याकडील २९ लाख रुपयांची रोकड लुटली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरोड्याची माहिती मिळताच निरीक्षक सुनील महाडिक यांनी तत्परतेने नागरिकांना व्हॅाटसअप ध्वनीसंदेशाद्वारे दरोडेखोरांचे वर्णन व दुचाकींची माहिती दिली. त्यामुळे एका जबाबदार नागरिकाने पाटस - बारामती रस्त्यावर त्यापैकी एका विना क्रमांकाच्या दुचाकीचा पाठलाग केला असता चोरट्यांनी रस्त्यात दुचाकी सोडून पळ काढला. सदर दुचाकी व त्याला लावलेल्या पिशवीतील ८ लाख २८ हजार रूपये पोलिसांनी जप्त केले होते. ३० ऑगस्ट रोजी पहाटे यवत पोलिसांनी पाटस मध्ये प्रकाश पांडुरंग गोरगल (वय ३६, रा. वाखारी, ता. दौंड ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ लाख १० हजार रूपये हस्तगत केले. त्याच्याकडील माहितीच्या आधारे विक्रम विलास शेळके (वय २३, रा. वाखारी) यास अटक करण्यात आली. गोरगल व शेळके यांनी गुन्ह्याची कबुली दिली परंतु त्यांना इतर साथीदारांची नावे माहित नसल्याने तपास पुढे सरकत नव्हता.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, दौंड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात सहभागी असलेले जाड्या उर्फ पैगंबर तय्यब मुलाणी (वय २०, रा. आमराई, बारामती), अख्ख्या उर्फ अक्षय बाळासाहेब वावरे (वय २०, रा. माळेगाव, ता. बारामती) व मनोज बाळासाहेब साठे (वय २२, रा. रुई, ता. बारामती) यांना १५ सप्टेंबर रोजी अटक करीत त्यांच्याकडून ८ लाख ३६ हजार रूपयांची रोकड जप्त केली.  अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उप अधिक्षक गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील महाडिक, सहायक निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी सुरज गुंजाळ, महेश पवार, हेमंत भोंगळे, गोरख मलगुंडे, संजय देवकाते, जब्बार सय्यद, नारायण वलेकर, सचिन बोराडे, आदींनी या तपासात भाग घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daund police arrested the robbers