दौंड - सत्ता व निवडणूक नसताना झालेली वाजपेयीजींची दौंड येथील सभा

दौंड - सत्ता व निवडणूक नसताना झालेली वाजपेयीजींची दौंड येथील सभा

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोणतीही निवडणूक नसताना आणि भाजपची सत्ता नसताना ३४ वर्षांपूर्वी आदरणीय वाजपेयी यांची सभेला अलोट गर्दी झाली होती. जिल्हा भाजपच्या वतीने त्यांना पाच लाख रूपयांची थैली प्रदान करण्यात आली होती. त्यांची ओघावती वाणी, तेजोमय चेहरा, अमोघ वक्तृत्व, आत्मविश्वास आणि पक्ष व संघटनावर नितांत विश्वास असलेल्या वाजपेयीजींच्या आठवणींनी दौंडकरांना गहिवरून आले आहे. 

दौंड शहरात २ सप्टेंबर १९८३ रोजी पुणे जिल्हा भाजपच्या वतीने तत्कालीन खासदार व पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा जाहीर सत्कार महात्मा गांधी चौकात करण्यात आला होता. 

वाजपेयी यांच्या दौंड येथील सभेच्या आठवणी सांगताना पक्षाचे तत्कालीन जिल्हा चिटणीस मोहनलाल भंडारी म्हणाले, ``१९८३ मधील सभेस दौंड तालुक्यासह शेजारील बारामती, इंदापूर, शिरूर, श्रीगोंदे तालुक्यातून अपूर्व जनसागर लोटला होता. पांढरे शुभ्र धोतर व झब्बा परिधान करणारे, तेजोमय चेहर्यातील अटलजींची ओघावती व मधाळ वाणीने जनसागर मंत्रमुग्ध झाला होता. शेतकर्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाल योग्य भाव मिळावा आणि त्याचबरोबर ग्राहकांना योग्य भावाने व वेळेवर हा माल मिळाला तरच देश सुजलाम - सुफलाम झाला असे म्हणता येईल, असे वाजपेयीजींनी यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचबरोबर देशात शेतकरी एकमेव असा उत्पादक आहे जो त्याने उत्पादित केलेल्या मालाचे भाव स्वतः ठरवित नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. वाजपेयीजींनी सभेत कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना, व्यक्तीवर थेट टीका न करता देश, राज्य व स्थानिक प्रश्नांवर मात्र हल्लाबोल केला होता. 

वाजपेयीजींच्या या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष व दौंडचे जनता पक्षाचे आमदार राजाराम ताकवणे होते. डॅा. अरविंद लेले, विद्यमान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह विश्वास गांगुर्डे, महिला आघाडीच्या तत्कालीन जिल्हाध्यक्षा प्रा. सुशीलाताई आठवले, संभाजी भुजबळ, कांचनभाई शहा, प्रकाशलाल बोगावत, चंपालाल सरनोत, गिरीश अग्रवाल, आदी व्यासपीठावर होते, अशी माहिती श्री. भंडारी यांनी दिली. 

सोय कसली कुचेष्टा केली....
अटल बिहारी वाजपेयी हे सभेस्थानी दौंड शहरातील कुरकुंभ मोरीमधून पायी आले होते. मोरीवर रेल्वेने पादचार्यांसाठी बांधलेला अतिउंच पादचारी पूल त्यांच्या नजरेतून सुटला नाही. पुलाकडे पाहून त्यांनी इतका उंच पूल कशाला बांधला?, अशी विचारणा करीत माहिती घेतली. सभेत त्यांनी पुलाचा उल्लेख करीत ``रेल्वेने सोय तर दुरच कुचेष्टा केली``, या शब्दांत टीका केली होती. कालांतराने हा पूल वापरात नसल्याने रेल्वे प्रशासनाने पाडून टाकला. दुर्देवाने आजही जुन्या व नवीन मोरीतून पादचारी व वाहनचालक चाचपडतच जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com