esakal | कर्णबधिर जोडप्याची उद्योजकतेत ‘श्वेत’भरारी
sakal

बोलून बातमी शोधा

couple

कर्णबधिर जोडप्याची उद्योजकतेत ‘श्वेत’भरारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिद्द असेल तर कुठल्याही अडथळ्यावर मात करता येते, असे म्हणतात. इचलकरंजीच्या वरुण आणि श्रुती बरगाले या कर्णबधिर जोडप्याने ही उक्ती खरी करून दाखवली आहे. अपंगत्वाचा बाऊ न करता त्यांनी स्वयंपूर्ण होण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तसेच राज्याच्या विविध भागांतील कर्णबधिर युवकांनीही या व्यवसायात ते सहभागी करून घेत आहेत. कंपनीच्या माध्यमातून त्यांनी एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.

रोजगाराच्या संधी शोधत असताना, वरुण यांनी शर्ट विक्रीच्या व्यवसायास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी १० ऑक्टोबर २०१८ रोजी ‘अॅडोरेबल व्हाइट कलेक्शन’ (एडब्ल्यूसी) ही कंपनी स्थापन केली. एका शिलाई मशिनवरून केवळ ४ हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांचा प्रारंभ झाला. तीन वर्षांतच यशाच्या पायऱ्या चढत आज त्यांच्या मालकीच्या १५ मशिन असून सुमारे २० कामगारांना त्यांनी रोजगार दिला आहे. कंपनीने अवघ्या वर्षभरातच सुमारे ४८ लाख रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठला. या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीत केवळ पांढऱ्या शर्ट आणि कुर्त्यांची निर्मिती केली जाते. शांततेचं आणि समानतेचं प्रतीक असणारा हा पांढरा रंग आज या कंपनीची ओळख झाला आहे.

हेही वाचा: पुणे : आदर्श घालून देणाऱ्या तरुणांचे आयुक्तांनी कौतुक करावे.

‘एडब्ल्यूसी’मध्ये ८ मापांचे शर्ट्स आणि कुर्ते उपलब्ध आहेत. सध्या पुरुषांसाठीच्याच वस्त्र प्रावरणांची निर्मिती होत असली तरी लवकरच स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी देखील ते उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. याशिवाय कोरोना काळातील गरज लक्षात घेऊन कंपनीने मास्कच्या निर्मितीलाही सुरुवात केली. थ्री लेअर आणि परफेक्ट फिटिंग असलेल्या त्यांच्या मास्कला राज्यभरात आणि परराज्यातूनही मागणी आहे.

सध्या पुणे, नागपूर, मुंबई, सातारा, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, धुळे, फलटण आदी ठिकाणी कंपनीच्या शाखा आहेत. येत्या काळात कंपनीचा देशात विस्तार करण्याची वरुण आणि श्रुती यांची इच्छा आहे. या विस्तारातून अधिकाधिक कर्णबधिर व मूकबधिर व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय त्यांनी डोळ्यांसमोर ठेवले आहे.

हेही वाचा: परंपरेची नग्नता; पावसासाठी अल्पवयीन मुलीचा छळ!

कर्णबधिर आणि मूकबधिर व्यक्तीही सामान्य व्यक्तींप्रमाणे काम करू शकतात, हेच आम्हाला या माध्यमातून सिद्ध करायचे आहे. आमचे उत्पादन विकत घेऊन तुम्हीही त्याचा अनुभव घेऊन पाहा, असे आवाहन उभयतांनी केले आहे.

‘गुणवत्तेमुळे यशस्वी व्यवसाय’

‘एडब्ल्यूसी’चे कंपनीचे वितरक म्हणून वरुण व श्रुती यांनी कर्णबधिर युवकांनाच संधी दिली आहे. त्यातील एक म्हणजे विनीत झेंडे. पुण्याचा वितरक असलेला विनीत ‘एडब्ल्यूसी’ बाबत म्हणाला, ‘‘मी व वरुण शाळेपासूनचे मित्र. वरुणने व्यवसाय सुरू केला तेव्हाच पुण्याचा वितरक होणार का, असे विचारले. मी इचलकरंजीला जाऊन कपड्यांची गुणवत्ता पाहून होकार दिला. तीच गुणवत्ता आजही टिकवून ठेवल्याने आणि त्याला प्रामाणिकपणाची जोड दिल्याने व्यवसाय बहरत आहे.’’

loading image
go to top